Manja
Manja

मांजा खरेदी-विक्री, साठवणुकीवर बंदी! 

सोलापूर : मानवासह पशू-पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरलेला नायलॉन, चायनीज आणि काचेरी मांजाच्या खरेदी-विक्री आणि साठवणुकीवर पोलिस आयुक्तालयाने बंदी आणली आहे. "सकाळ'ने या संदर्भात बातमीच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. या निर्णयाचे सोलापूरकरांनी स्वागत केले असून आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

शहरात अनेक ठिकाणी मुले धोकादायक पद्धतीने पतंग उडवताना दिसून येतात. गेल्या महिन्यात पतंग उडवताना तोल जाऊन ड्रेनेजच्या खड्ड्यात पडल्याने वैभव शिंदे या मुलाचा मृत्यू झाला आहे. मांजा उडवण्यासाठी नायलॉन, चायनीज आणि काचेरी मांजा वापरण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी मांजाची खुलेआम विक्री होत असल्याची बातमीमध्ये "सकाळ'मध्ये 24 ऑक्‍टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. "सकाळ'च्या बातमीची दखल घेऊन पोलिस आयुक्त तांबडे यांनी मांजा बंदीचा आदेश काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलिस उपायुक्त एम. बी. गायकवाड यांना दिले आहेत. 

राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने धोकादायक मांजा विक्री, खरेदी व साठवणुकीवर बंदी आणली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मांजा विक्रीला बंदीसंदर्भातील आदेश काढला असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. 
- महादेव तांबडे, पोलिस आयुक्त 

धोकादायक मांजामुळे मानव, पशु-पक्ष्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलिस आयुक्तालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. या संदर्भात शाळा, महाविद्यालयात मार्गदर्शन होण्याची आवश्‍यक आहे. 
- वंदना आळंगे, शिक्षिका 

काय आहे आदेश? 
शहरात नायलॉन, चायनीज, काचेरी मांजा निर्मिती, विक्री, खरेदी आणि साठवणूक करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीस अडथळा होईल. लोकांच्या जीवितास धोका होईल अशा प्रकारे पतंग उडवू नये. पतंगाच्या स्पर्धा भरवू नयेत. सार्वजनिक रस्त्यावरील झाड, दिवे, विजेच्या तारांना अडथळा होईल अशा प्रकारे पतंग उडवू नये, असे आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com