दोन पंतप्रधानांचा विश्‍वास सार्थ ठरवणारे बांदिवडेकर

दोन पंतप्रधानांचा विश्‍वास सार्थ ठरवणारे बांदिवडेकर

आपटी - स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सरकारने पोलिस भरतीत कोल्हापूरसाठी दोन जागा ठरवलेल्या असतानाही नानासाहेबांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झालेल्या तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांनी ब्रिटिश सरकारकडून जादा जागा मंजूर करून पोलिस सेवेत घेतलेल्या व कोल्हापूर संस्थानच्या प्रायमिनिस्टरांचा विश्‍वास सार्थ ठरवणारे पन्हाळ्याच्या ऐतिहासिक मातीत जन्मलेले मनोहर ऊर्फ नानासाहेब दत्तात्रय बांदिवडेकर यांनी आज शंभरीत प्रवेश केला आहे.

वडील दत्तात्रय विठ्ठल बांदिवडेकर ऊर्फ काका बांदिवडेकर हे सोनारकाम करत. तर आई आनंदीबाई ऊर्फ माई या गृहिणी. १९२३ साली काका बंदिवडेकरांनी पन्हाळ्यातील २० मित्रांसोबत सायकलवरून विशाळगड, गगनबावडा पर्यटन केले. पुरोगामी विचारांच्या काका व माई बंदिवडेकरांच्या पोटी २९ एप्रिल १९२० या दिवशी नानासाहेबांचा जन्म झाला. नानासाहेबांचे प्राथमिक शिक्षण पन्हाळा येथे, माध्यमिक शिक्षण सातारा येथे, तर कोल्हापूर येथील राजाराम कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण झाले. त्यानंतर साईक्‍स लॉ कॉलेज येथे प्रवेश घेतला. पोलिस भरतीसाठी अर्ज करून तत्कालीन कोल्हापूर संस्थानचे प्रायमिनिस्टर इ. डब्ल्यू. पेरी यांच्या नजरेत भरल्याने १९४० साली पोलिस सेवेत रुजू झाले.

स्वातंत्र्यपूर्व व त्यानंतरच्या काळात केलेल्या पोलिस सेवेत स्व. पंडित नेहरू व स्व. लालबहादूर शास्त्री या दोन माजी पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडलेल्या नानासाहेबांनी पोलिस सब इनिस्पेक्‍टर पदापासून सुरू केलेल्या पोलिस सेवेत उपविभागीय पोलिस अधिकारी पदापर्यंत मजल मारली. १९५४ साली माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा मुक्काम रत्नागिरी येथील थिबा पॅलेसवर होता, तेव्हा पूर्ण दिवस सुरक्षा यंत्रणेत त्यांनी काम केले. तर १९५६ साली लालबहाद्दूर शास्त्री सहकुटुंब नागपुरात आले असताना त्यांच्याही सुरक्षा यंत्रणेत नानासाहेबांनी काम केले. पोलिस सेवेच्या उत्तरार्धात १९७३ साली नानासाहेब सीआयडी ब्रँच पुणे येथे रुजू झाले.

निवृत्तीच्याच दिवशी कृष्णा सहकारी साखर कारखाना रेठरे (ता. वाळवा) येथे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून ते रुजू झाले. हे पद त्यांनी १० वर्षे भूषविले. ३४ वर्षे नोकरी करून ४३ वर्षे निवृत्ती वेतन घेणारे नानासाहेब बांदिवडेकर हे एकमेव व्यक्ती असतील. नानासाहेबांना पाच मुली व एक मुलगा, अशी सहा अपत्ये असून सर्व मुले उच्चशिक्षित आहेत. नानासाहेबांना नोकरीच्या काळात अनेक प्रशस्तिपत्रे, सन्मानचिन्ह मिळाली असून, आजही ती त्यांनी जपून ठेवली आहेत.

गडहिंग्लज येथे पोलिस सबइन्स्पेक्‍टर म्हणून कार्यरत असताना स्वतंत्र्य भारताचा पहिला राष्ट्रध्वज फडकावण्याचा मान मिळाला. स्व. पंडित नेहरू व स्व. लालबहादूर शास्त्री या दोन माजी पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत काम करण्याची संधी हे आयुष्यातील सुवर्णक्षण आहेत.                       
- मनोहर ऊर्फ नानासाहेब बांदिवडेकर

शंभरी मागील रहस्य
कमी आहार, भरपूर व्यायाम, आई-वडिलांची सेवा, प्रामाणिक राहणे, परमेश्‍वराचे नामस्मरण, स्वतःची तब्येत सांभाळणे हेच शंभरी मागील रहस्य असल्याचे नानासाहेब सांगतात.

फक्त वडिलांसाठी
१९४० साली नानासाहेबांना मास्तर विनायक यांनी चित्रपटात हिरो म्हणून काम करण्यासाठी बोलावले होते; पण वडिलांचा त्याला विरोध असल्याने त्यावेळी नानासाहेबांनी ती ऑफर नाकारली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com