मनोमीलन, ऐक्‍य...मग लढतीचा विचार

संजय थोरात
बुधवार, 13 जुलै 2016

इस्लामपूर - नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी आघाडीला मनोमीलन, ऐक्‍य व मग लढत हे टप्पे पार करून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग आरक्षण घोषित झाल्यामुळे दोन्ही आघाड्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

इस्लामपूर - नगरपालिका निवडणुकीसाठी सत्ताधारी राष्ट्रवादी आणि विरोधी आघाडीला मनोमीलन, ऐक्‍य व मग लढत हे टप्पे पार करून निवडणूक लढवावी लागणार आहे. प्रभाग आरक्षण घोषित झाल्यामुळे दोन्ही आघाड्यांनी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.

नगरपालिकेत आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता आहे. स्थानिक पातळीवर प्रतोद विजय पाटील या गटाचे नेतृत्व करीत आहेत. आमदार जयंत पाटील यांचे लोकप्रिय नेतृत्व, १९८५ पासून गतिमान केलेली विकासाची प्रक्रिया, कार्यकर्त्यांचे मोहोळ या सत्तारूढ आघाडीच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र सत्तारूढ गटाला मतभेदांचे ग्रहण लागले आहे. प्रतोद विजय पाटील, एन. ए. ग्रुपचे नेते खंडेराव जाधव, चिमण डांगे असे नगरसेवकांत गट आहेत. प्रतोद विजय पाटील यांच्या कारभारावर उपनगराध्यक्ष संजय कोरे, ज्येष्ठ नगरसेवक बबन अनंत पाटील, खंडेराव जाधव यांनी अनेकवेळा सभागृहात प्रहार केलेत. राष्ट्रवादीमध्ये सभागृहाबाहेरील एक गटदेखील प्रतोद विजय पाटील यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न करीत असतो. या गटतटांचे मनोमिलन करणे, ऐक्‍य घडवून आणणे व मग सत्ता हस्तगत करणे यासाठी राष्ट्रवादी गोटात हालचाली सुरू आहेत. तालुका पातळीवर जयंत पाटील यांचे नेतृत्व मान्य, पण स्थानिक पातळीवर ‘तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी राष्ट्रवादीत बऱ्याच जणांची अवस्था आहे. स्थानिक पातळीवरील हे मतभेद मिटवून एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचे राष्ट्रवादीसमोर आणि आमदार जयंत पाटील यांच्यासमोर आव्हान आहे. यापूर्वीच्या निवडणुकांप्रमाणे सत्तारूढ गट राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवेल. सत्तारूढ गटाने विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. पाणी योजना, शिवाजी पुतळा, आंबेडकर पुतळा सुशोभीकरण, उद्याने अशी विकासकामे सांगत सत्तारूढ गट निवडणुकीला सामोरा जाणार आहे.

इस्लामपूर पालिकेत हाताच्या बोटावर मोजण्याइतके विरोधक आहेत. विरोधी आघाडीत महाडिक युवा शक्‍ती, शिवसेना, भारतीय जनता पक्ष, मनसे, काँग्रेस, एमआयएम, स्वाभिमानी शेतकरी संघटना असे अनेक घटक एकत्र येऊ इच्छितात. खासदार शेट्टी व राज्यमंत्री सदाशिव खोत यांनी परिवर्तनासाठी विरोधकांच्या गट्टीची घोषणा केली आहे. श्री. खोत यांच्या सत्कार समारंभात हे गट उपस्थित होते. विक्रम पाटील, वैभव पवार, आनंदराव पवार, सम्राट महाडिक, विजय कुंभार हे तरुण नेते विरोधी ऐक्‍यासाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात विरोधकांची मोळी बांधण्याची, गट्टी करण्याची घोषणा झाली तरी विरोधकांत स्थानिक पातळीवर एकमुखी नेतृत्वाचा अभाव आहे. परस्परांविषयी गैरसमज, गैरविश्‍वास आणि नेतृत्वाचा अहंकार ही विरोधी आघाडीची वैशिष्ट्ये ठरलीत. ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांनी विरोधी आघाडीचा त्याग करून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर विरोधकांचे सभागृहातील बळ घटले आहे. इस्लामपूर पालिकेत परिवर्तनासाठी विरोधकांना अहंकार विसरून एकत्र यावे लागेल. अगोदर मनोमिलन, नंतर ऐक्‍य, नंतर उमेदवार शोधणे व ते टिकवणे असे विरोधकांसमोर आव्हान आहे. संभाव्य ऐक्‍याच्या घोषणेला विरोधक कसे बळ पुरवतात, की फाटाफुटीच्या इतिहासाची पुनरावृत्ती करतात, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

क्रिया, प्रतिक्रिया ध्रुवीकरणाला वेग
इस्लामपूर पालिकेच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण अजून घोषित झालेले नाही. आरक्षण घोषित होताच क्रिया, प्रतिक्रिया व ध्रुवीकरणाला वेग येईल. तूर्तास दोन्ही आघाड्यांसमोर मनोमिलन, ऐक्‍य व लढत असे पर्याय आहेत.

Web Title: Manomilan, unity and fighting against the idea ...