esakal | या प्रकल्पाबाबत सांगलीत सर्व पक्षांत संशयाचा धूर... वाचा सविस्तर

बोलून बातमी शोधा

 Many doubts are there in all parties about the waste project in Sangali

घनकचरा कचरा प्रकल्पाबद्दल आता अनेक शंका उपस्थित होत असून त्याचा धूर आता सर्वच पक्षांतून निघू लागला असल्याचे दिसत आहे.

या प्रकल्पाबाबत सांगलीत सर्व पक्षांत संशयाचा धूर... वाचा सविस्तर
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः घनकचरा प्रकल्पाचा धूर आता सर्वच पक्षांच्या अंतर्गत बैठकांमधून निघत आहे. या महापालिकेच्या सत्तेत भाजप असला तरी विरोधक म्हणून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य मूग गिळून गप्प का आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे. दरम्यान, कचरा प्रकल्पाबद्दल आता अनेक शंका उपस्थित होत असून त्याचा धूर आता सर्वच पक्षांतून निघू लागला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, उद्या निविदा प्रसिद्ध होणार असून या निविदा प्रक्रियेला आणखी मुदतवाढ देण्यासाठी प्रशासनावर काही पक्षनेत्यांकडून दबाव सुरू आहे. 

प्रशासनातील काही अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले झाले असून एकूणच कचरा प्रकल्प महापालिकेच्या हिताचा आहे की नाही, याबाबत प्रश्‍न उपस्थित झाला आहे. उद्या हा प्रकल्प ड्रेनेज योजनेसारखा अपयशी ठरला तर काय? याबाबत भाजपच्या काही नेत्यांनी चिंता व्यक्‍त केली असल्याचे समजते. काल कोल्हापुरात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, खासदार संजय पाटील यांच्यासोबत चर्चा झाली.

ही बैठक केंद्र सरकारची कामगिरी जनतेपर्यंत नेण्यासाठी झाली असल्याचे समजते; तथापि या बैठकीत कचरा प्रकल्प आणि महापालिकेतील कारभारावरही चर्चा झाली असल्याचे समजते. विशेषत: कचरा प्रकल्प हा विषय महासभेसमोर आणून पारदर्शक भूमिका घेतली जावी, असा आग्रह आमदार गाडगीळ यांनी धरल्याचे समजते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातल्याने योजनेच्या भविष्याबाबत चर्चा होईल, अशी अपेक्षा एका नेत्याने व्यक्‍त केली. अर्थात, या बैठकीस निविदा प्रक्रियेचे समर्थक असलेले पालिकेतील भाजप नेते अनुपस्थित होते, यातून सूचकता लक्षात येते. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्येही आता आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचे महापालिकेतील सर्वच घडामोडींकडे बारकाईने लक्ष असते. सध्याच्या कचरा प्रकल्पाच्या स्थायीतील ठराव मंजुरीसाठीही त्यांनी भाजप नेत्यांच्या बरोबरीने लक्ष घातल्याचे समजते. पालिकेतील गटनेते मैन्नुद्दीन बागवान यांची या पदावरून लवकर उचलबांगडी करण्याचे संकेत त्यांनी गेल्या आठवड्यात दिले होते. या पार्श्‍वभूमीवर बागवान यांनी कचरा प्रकल्पाची चर्चा महासभेसमोर व्हावी, अशी मागणी आज केली. ती करताना त्यांनी कॉंग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांची भूमिका योग्यच असल्याचे सांगितले. 

कॉंग्रेसमध्येही सारे काही आलबेल नाही. स्थायी समितीत कॉंग्रेसच्या सर्वच सदस्यांनी मौन पाळले होते. स्थायीतील तरुण तुर्क सदस्यांनी भाजपशी चांगलेच संधान बांधले असून त्यांनी गटनेत्यांच्या भूमिकेकडे साफ दुर्लक्ष करीत स्थायी समितीत भूमिका घेतली. हा विषय महासभेसमोर चर्चेला यावा, अशी साखळकर यांनी मागणी केली होती; मात्र त्यावर विरोधी पक्षनेते निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर गेले वीस दिवस कसला "अभ्यास' करीत होते, असा सवाल कॉंग्रेसच्या एका तरुण सदस्याने पक्षबैठकीत केल्याचे समजते. एकूणच तीनही पक्षांच्या नेत्यांची भूमिका एकीकडे आणि स्थायीतील सदस्यांची भूमिका मात्र वेगळीच, अशी सध्याची तीनही पक्षांची स्थिती आहे. दीडशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प जर सांगली, मिरज, कुपवाड या तीन शहरांच्या हिताचा नसेल तर एवढी घाईगडबड कशासाठी? या प्रकल्पावर कॉंग्रेसचे शहरातील नेते पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील यांच्या भूमिका काय आहेत ते देखील गुलदस्त्यातच आहे. एकूणच हा विषय महासभेसमोर येऊन चर्चा केल्याशिवाय पुढील प्रक्रिया थांबविणेच आता भाजपच्या दृष्टीने हिताचे आहे! 

निविदा प्रक्रियेस मुदतवाढ 
तीनही पक्षांतील नेत्यांचा तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांचा स्थायी समितीतील सदस्यांविरोधात वाढता रोष लक्षात घेता कचरा प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेस आणखी वाढ देण्यात येणार असल्याचे समजते. उद्या निविदा प्रसिद्ध होणार असल्या तरी त्यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता व्यक्‍त होत आहे. भाजपच्या कोल्हापुरातील बैठकीतही हा विषय महासभेसमोर चर्चेला आणावा, अशी आग्रही मागणी झाल्याचे कळते.