मराठा आरक्षणासाठी घटना दुरस्ती हाच पर्याय - आठवले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - ""मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर कितपत टिकू शकेल याविषयी साशंकता आहे. कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरस्ती करणे हाच पर्याय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. कोणी मोर्चा काढलाच तर त्यात मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मागणी असावी,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

कोल्हापूर - ""मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयीन पातळीवर कितपत टिकू शकेल याविषयी साशंकता आहे. कायमस्वरूपी आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरस्ती करणे हाच पर्याय आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे. कोणी मोर्चा काढलाच तर त्यात मराठ्यांना आरक्षण मिळावे, अशी मागणी असावी,'' असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मराठा-दलित ऐक्‍य परिषद होत आहे. त्यासाठी आठवले कोल्हापुरात आले आहेत. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ""शिक्षण महाग झाले, दुष्काळ पडतोय, नवनवीन तंत्रज्ञान आले, त्यात मनुष्य बळाचा वापर कमी झाला. अशा स्थितीत मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त आहे. किबंहुना मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने पूर्वीपासून केली आहे. ती आजही कायम आहे. मराठा, पटेल, जाट, रजपूत, ब्राह्मण समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनात्मक बदल करणे हाच पर्याय सध्या दिसत आहे.'' 

""मराठा समाजाने नेत्यांना बाजूला करून मूक मोर्चे काढले. त्यात आरक्षणाची मागणी होती; पण ऍट्रॉसिटी कायद्याच्या दुरस्तीचा मुद्दाही होता. त्यावर काही घटकांत संभ्रम तयार झाला. त्यातून ऍट्रॉसिटी कायदा रद्द करू नये तो अधिक सक्षम करावा अशा मागणीसाठी प्रतिमोर्चे निघू लागले. पण कोणी कितीही मोर्चे काढले तरी ऍट्रॉसिटी कायदा रद्द होणार नाही. पण या कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष राहिले पाहिजे. निरापराध्यांना या कायद्याचा आधार घेऊन गुंतवले जाऊ नये यासाठी कायद्यात दुरस्त्या करण्याचा विचार होईल. त्यासाठी सूचना, हरकती मागविण्यात येतील. यासाठी प्रतिमोर्चा काढण्याची गरज नाही. त्यातूनही कोणी मोर्चे काढले तर मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी काढावेत.'' 

ते पुढे म्हणाले, ""दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी आर्थिक विकास महामंडळांकडे निधी कमी आहे. त्यात वाढ करावी, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करूच; पण महामंडळाच्या कर्जाचा विनियोग व्हावा, कर्जे घेऊन त्याचा गैरवापर केल्यास अशांवर कारवाईसाठी आपण दक्ष राहणार आहोत.'' 

नोटा रद्दचा निर्णय योग्यच 

पाचशे व एक हजाराच्या नोटा रद्द करण्याचा सरकाराचा प्रयत्न चांगला आहे; पण अचानक झालेल्या बदलामुळे सर्वसामान्यांची कुंचबना होत आहे. ती होऊ नये यासाठी काही बदल करता यावेत, यासाठी पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.  तसेच रिपब्लिकन पार्टी उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणूक लढवेल. त्यासाठी भाजपचा सहयोग घेणार असून त्यांनी अपेक्षित जागा आम्हाला सोडाव्यात, अशी मागणी करणार आहे. किमान आमच्या 25 ते 30 जागा निवडून येतील असा विश्‍वास असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

Web Title: maratha dalit aikya