प्रक्षुब्ध मनाचा.. निःशब्द हुंकार...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 सप्टेंबर 2016

सोलापूर - सोलापूर शहराच्या चारही दिशांना बुधवारी प्रचंड असा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक. वाहनांची इतकी वर्दळ, की अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागाही अपुरी पडली. महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थिनींच्या लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मूक मोर्चाच्या निमित्ताने पदोपदी मराठा समाजाच्या प्रक्षुब्ध मनाचा, नि:शब्द हुंकार पाहावयास मिळत होता. 

सोलापूर - सोलापूर शहराच्या चारही दिशांना बुधवारी प्रचंड असा जनसागर उसळला होता. जिकडे नजर जाईल तिकडे भगवे झेंडे हातात घेतलेला मराठा बांधव दिसत होता. पाहावे तिकडे गर्दीने भरलेले रस्ते अन्‌ चौक. वाहनांची इतकी वर्दळ, की अनेक ठिकाणी पार्किंगसाठी जागाही अपुरी पडली. महिला, तरुण-तरुणी, विद्यार्थिनींच्या लक्षणीय उपस्थितीसह लाखोंच्या सहभागाने हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मूक मोर्चाच्या निमित्ताने पदोपदी मराठा समाजाच्या प्रक्षुब्ध मनाचा, नि:शब्द हुंकार पाहावयास मिळत होता. 

सकाळी आठ वाजल्यापासूनच लाखो मराठा बांधव मोर्चाच्या प्रवाहात सहभागी होत होते. मुली, महिलांची हजेरी लक्षवेधी ठरली आणि मोर्चाने येथेही इतिहास रचला. सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात सर्वांत मोठा मोर्चा म्हणून त्याची चर्चा रंगली आहे. कोपर्डी (जि. नगर) येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध, मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर या मोर्चाने लक्ष वेधले. शिस्त, संयम, उत्कृष्ट नियोजन, महिला, तरुणींना प्राधान्य, मोर्चेकऱ्यांची काळजी, पाणी-नाश्‍त्याची व्यवस्था, मोर्चानंतर स्वच्छता, त्यासाठी राबणारे मोर्चातीलच चेहरे आणि विशेष म्हणजे नेतृत्वासाठी नसलेला कुठलाही विशिष्ट चेहरा ही मोर्चाची वैशिष्ट्ये ठरली. गेल्या एक ते दीड महिन्यापासून जिल्हाभर या मोर्चाची तयारी सुरू होती. गावपातळीपर्यंत नियोजन केले होते. मोर्चाची वेळ सकाळी अकरा-बाराच्या आसपासची असली तरी स्वयंस्फूर्तीने जत्थेच्या जत्थे सूर्य उगवल्यापासूनच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याकडे येत होते. त्यामुळे काही वेळात हा परिसर खचाखच भरून गेला. वाहनांच्या तोबा वर्दळीमुळे पार्किंगलाही जागा पुरली नाही. 

साडेअकराच्या सुमारास जिजाऊ वंदनेने मोर्चाला सुरवात झाली. मोर्चाचे सुरवातीचे टोक होम मैदानावर तर शेवटचे टोक बाळे म्हणजे सहा ते सात किलोमीटर होते. होम मैदान ते छत्रपती संभाजी महाराज पुतळा (जुना पुणे नाका) या व्हीआयपी रस्त्यावर गर्दीचा महापूर होता. सर्वत्र मराठामय वातावरण झाले होते. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग, बार्शी रस्ता, मंगळवेढा रस्ता, अक्कलकोट रस्त्याने मराठा बांधवांचा जनसागर शहरात येत होता. शहरातील डफरीन चौक ते पुणे नाका हा व्हीआयपी रोड, रंगभवन चौक ते डफरीन चौक, भय्या चौक ते नवीवेस पोलिस चौकी, रामलाल चौक, रेल्वे स्टेशन हा भाग जनसागराने भरून गेला होता. 
 

कोणा एकाचे नेतृत्व नसलेला हा मोर्चा छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला व होम मैदानावर विसावला. अग्रभागी लाखोंच्या संख्येत आलेल्या मुली, महिला होत्या. त्यानंतर वकील, डॉक्‍टर, प्राध्यापक, विद्यार्थी, तरुण, सर्वसामान्य नागरिक, शेवटी राजकीय पुढारी अशी मोर्चाची रचना होती. लाखावर भगवे झेंडे घेऊन तरुण यात सहभागी होते. एक मराठा, लाख मराठा उल्लेखाच्या टोप्या अनेकांच्या डोक्‍यावर होत्या. अनेकांनी मराठा क्रांती मूकमोर्चा अशा उल्लेखाचे काळे टी-शर्ट घातले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोचताच पाच मुलींनी जिल्हाधिकारी रणजित कुमार यांनी निवेदन दिले. त्यानंतर होम मैदानावर उभारण्यात आलेल्या स्टेजवरून या मुलींनी निवेदनाचे वाचन केले व राष्ट्रगीताने मोर्चाची सांगता झाली. मोर्चा संपल्यानंतरही अगदी शिस्तीने सर्वजण मार्गस्थ होत होते. 
 

लेकी, भगिनी, मातांना विश्‍वास देणारा मोर्चा 
सोलापुरातील हा मोर्चा मराठा समाजातील लेकी, भगिनी, मातांना खऱ्या अर्थाने विश्‍वास देणारा ठरला. मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक माणूस महिलांचं अतिशय आदरपूर्वक स्वागत करत होता, त्यांना रस्ता करून देत होता, पाणी देण्यापासून माहिती सांगण्यापर्यंत सर्वकाही मदत करत होता. आपल्याला मदत करणारे हे लोक आपल्या घरातील कुणीतरी आहेत, अशी भावना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर दिसत होती. संपूर्ण मोर्चामध्ये तरुणी, महिला आत्मविश्‍वासाने सहभागी झाल्याचे दिसून आले. 
 

निर्भयाच्या आठवणीने सर्वच हेलावले 
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आल्यानंतर कोपर्डीची निर्भया, आत्महत्या केलेले शेतकरी आणि शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी कोपर्डीच्या निर्भयाचे नाव घेताच संपूर्ण मोर्चा त्या अमानवी अत्याचाराच्या कटू आठवणीने हेलावून गेला. लाखोंच्या संख्येने असलेल्या जनसमुदायात श्रद्धांजली वेळी एकच शांतता पसरली होती. 
 

मूक मोर्चाचे आदर्श उदाहरण 
सोलापूरच्या मूक मोर्चाने एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कोणतीही घोषणाबाजी, टाळ्या, हुल्लडबाजी दिसून आली नव्हती. लोकांना त्रास होईल असे कोणतेच कृत्य मोर्चात पाहावयास मिळाले नाही. सर्वजण शांततेतच मोर्चामध्ये सहभागी होत होते. मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मूक आक्रोश, व्यवस्थेविरुद्धची चीड आणि उद्रेक स्पष्ट दिसत होता. 
 

मोर्चाची क्षणचित्रे... 
- वेगवेगळ्या फलकांनी वेधले लक्ष 
- काळे टी-शर्ट, ड्रेस घालून व रिबन बांधून निषेध 
- लाखोंच्या संख्येने मुली, महिला सहभागी 
- तरुण, विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय 
- मोर्चात पोशाख घालून वकिलांचा सहभाग 
- मोर्चासाठी ठिकठिकाणी पाणी पाऊच वाटप 
- शाळा व महाविद्यालयांना अघोषित सुटी 
- शासकीय कार्यालये, न्यायालय, बॅंका व इतर ठिकाणी शुकशुकाट 
- खासगी दवाखाने व वैद्यकीय सेवा ठप्प 
- मोर्चेकऱ्यांत अभूतपूर्व उत्साह 
- मोर्चाच्या रस्त्यावर पाणीवाटप केंद्र 
- दोन हजार स्वयंसेवक कार्यरत 
- 500 होमगार्ड पोलिसांच्या मदतीला 
- मोर्चा संपल्यानंतर स्वयंसेवकांकडून स्वच्छता 
 

मोर्चेकऱ्यांच्या मागण्या 
- कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशी द्या 
- ऍट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर थांबवावा 
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा 
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उभारणीला चालना द्यावी 
- शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत 
- मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे 
 

मोर्चातील लक्षवेधी फलक 
- आम्ही जिजाऊंच्या लेकी, अन्यायाविरुद्ध झाली आमची एकी 
- विखुरला होता मराठा तक्तासाठी, एकत्र येतोय रक्तासाठी 
- आरक्षणासाठी 288 आमदारांचे विशेष अधिवेशन बोलवा 
- तमाम मराठा बंधू-भगिनींनो ही वज्रमूठ अशीच अखंड ठेवू 
- भीक नाही, हक्क मागतोय 
- रडायचं नाही, आता लढायचं 
- एक मराठा, लाख मराठा 
- आजवर लढलो मातीसाठी, एक लढा जातीसाठी 
- वाघाचं रक्षण, मराठा आरक्षण 
- शेतकऱ्यांचा नारा, सातबारा कोरा 
- बापजादे लढले मातीसाठी, आपण लढू आरक्षणासाठी 

Web Title: maratha kranti morcha gets huge response

टॅग्स