मोर्चाला आचारसंहिता पाळायचीच

सुनील पाटील
गुरुवार, 6 ऑक्टोबर 2016

नियोजन, शिस्त, शांतता ठेवण्याची आता कोल्हापूरकरांची जबाबदारी  

नियोजन, शिस्त, शांतता ठेवण्याची आता कोल्हापूरकरांची जबाबदारी  

कोल्हापूर - राज्यात शांततेत, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध निघालेल्या मोर्चांची राज्य किंवा देशातच नव्हे, तर परदेशातही दखल घेतली आहे. प्रसारमाध्यमे असो किंवा सोशल मीडिया याच मराठा क्रांती मोर्चाची छायाचित्रे आणि व्हिडियो झळकत आहेत. आता हीच शिस्त, शांतता आणि नियोजन पाळण्याची जबाबदारी १५ ऑक्‍टोबरला कोल्हापूरकरांची आहे. 
कोपर्डी येथील मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, मराठा आरक्षण मिळावे, ॲट्रॉसिटी कायद्यात बदल करा, शेतीला हमी भाव मिळावा, या प्रमुख मागण्यांसाठी निघणारा या मोर्चाचे प्रत्येक जण कौतुक करत आहे. 

कोणतीही घोषणा नाही, कोणाविरुद्ध राग नाही, कोणत्याही जातीविरुद्ध आक्षेप नाही, असा हा मोर्चा सर्वच जाती-धर्मांतील नागरिकांना आदर्शवत वाटत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील याच मोर्चासाठी सर्व जाती-धर्मांतील लोक पाठिंबा देऊन सहभाग घेण्याचा निर्धार करत आहेत. त्यामुळे मराठा समाजाची जबाबदारी वाढली आहे. 

राज्यात आतापर्यंत १५ ते ३५ लाखांहून अधिक जणांचा सहभाग असलेले मराठ्यांचे मोर्चे निघाले. यामध्ये आचारसंहितेला किंवा मोर्चाला गालबोट लागेल असा कोणताही प्रकार घडलेला नाही. जिथे मोर्चे झाले तिथे एक कागदही पडलेला दिसला नाही. मोर्चात तरुण-तरुणींनी कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे.  

आता सर्वांचे लक्ष कोल्हापुरातील मोर्चाकडे लागले आहे. गावागावांत मेळावे, बैठका घेऊन जनजागृती केली जात आहे. तरुण-तरुणींकडे प्रामुख्याने याची सुत्रे आहेत. 

अशी असेल आचारसंहिता...
घोषणा देऊ नका, घोषणा दिल्यास संयमाने रोखा
वैयक्तिक, संस्था-संघटनांच्या नावांचे बॅनर नको 
मोर्चात महिलांचा आदर करा  मोर्चातील कचरा कुंडीत टाका
मोर्चात कोणतेही व्यसन करून सहभागी होऊ नका 
महिला, लहान मुले व वृद्धांना पुढे जाऊ द्या
कुणालाही त्रास होईल असे वर्तन नको  

अन्य प्रमुख मागण्या : 
शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमुक्ती व शेतीमाल उत्पादन खर्चावर आधारित कायद्याने हमी भाव मिळालाच पाहिजे
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळ उच्च शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी कार्यरत करा
अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे, गडकिल्ले विकासाचे काम त्वरित सुरू करा 

सूचना : 
 मोर्चाला येताना पाण्याची बाटली व अल्पोपाहार घेऊन यावे. 
 मौल्यवान वस्तू व ऐवज बरोबर आणू नये.
 मुलांच्‍या खिशात पालकांनी मोबाइल नंबर लिहून ठेवावा.
 येणाऱ्या वाहनातील सर्वांनी गटप्रमुखाचा मोबाइल नंबर ठेवा. 
 आवश्‍यक औषधे बरोबर 

Web Title: maratha kranti morcha in kolhapur