मोर्चा शिस्तबद्ध, नियोजनानुसारच व्हावा

मोर्चा शिस्तबद्ध, नियोजनानुसारच व्हावा

कोल्हापूर - शेतीवरच अवलंबून असल्याने मराठा समाज मागास राहिला आहे. हा समाज ॲट्रॉसिटी कायदा रद्द करा, असे म्हणत नाही; पण या कायद्याचा आधार घेऊन खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आहे. शिक्षण व नोकरीत गुणवत्ता असतानाही त्याची पीछेहाट झाली असल्यानेच १५ ऑक्‍टोबरला कोल्हापुरात मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. मोर्चा शांत, शिस्तबद्ध आणि नियोजनानुसारच व्हावा, असे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आज केले. फुलेवाडी येथील एका खासगी सांस्कृतिक भवनात झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील मराठा समाज सधन समजला जातो. आता तशी परिस्थिती राहिली नाही. शेतीवर अवलंबून असणाऱ्या या समाजाची लोकसंख्या वाढेल तसे जमिनीचे क्षेत्रही कमी होत गेले आहे. त्यामुळे हा समाज मागास राहिला आहे.’’  

मोर्चाच्या दिवशी ‘गोकुळ’कडून पाण्याचे टॅंकर, ताक वाटप केले जाईल, असे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी सांगितले. 

बाबासाहेब पाटील-भुयेकर म्हणाले, ‘‘शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने प्रभावित असलेल्या या जिल्ह्यातील मराठा क्रांती मूक मोर्चात सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी सहभाग घेणार असल्याचे जाहीर केले आहे.’’  

एकनाथ भोसले (कांचनवाडी) म्हणाले, ‘‘मराठा समाज शिक्षण आणि नोकरीपासून कोसोदूर राहिला आहे. भविष्यात ही परिस्थिती नाही बदलली तर आपली पिढी आपल्या फोटो समोर उदबत्ती नव्हे तर चप्पल घेऊनच उभा राहील.’’  

बाजीराव खाडे (सांगरूळ) म्हणाले, ‘‘मराठा समाज शेतीवर अवलंबून आहे. आता शेती परवडण्यासारखी नाही. शेतीत शंभर रुपये घातले की १२५ रुपये मिळतात. उद्योगात १०० रुपये घातल्यास १००० रुपये मिळतात आणि सेवांमध्ये गुंतवल्यास १००चे १० हजार रुपये होत आहेत. पण इतर कोणत्याही व्यवसायात नसलेला मराठा समाज शेतीमुळे आणि आरक्षणाअभावी मागास राहिला आहे.’’ 

के. एच. पाटील (परिते) म्हणाले, ‘‘१९८० ते २०१२ दरम्यान जिल्हा परिषदेत नोकरी केली. पण, आमच्या मागून कामावर आलेल्यांना आरक्षणामुळे गट विकास अधिकारी किंवा अन्य पदावर बढती मिळाली. पण आम्ही निवृत्तीआधी केवळ एक ते दीड वर्षच हे पद भोगले या गोष्टीचे वाईट वाटते. यासाठी आरक्षण मिळालेच पाहिजे.’’ 

तत्पूर्वी सतीश देसाई, रणजित पाटील (फुलेवाडी), रघुनाथ मोरे (चर्मकार समाज), दिगंबर मेडशिंगे, धनाजी भोपळे (खाटकी समाज), प्रकाश पाटील (आमशी), प्रा. सुनील खराडे, सागर कापसे (लिंगायत समाज), अनिल सोलापूरे, दत्तात्रय पाटील (कसबा वाळवे) यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व स्वागत बाळासाहेब खाडे यांनी केले. 

कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकवू नका
राहुल पी. पाटील म्हणाले, ‘‘मराठा क्रांती हा मूक मोर्चा आहे. हे प्रत्येकाने लक्षात घेऊन मोर्चाला येताना कोणत्याही घोषणा देऊ नका. कोणत्याही पक्षाचा झेंडा फडकवू नका. शहरातील वाहने घराबाहेर काढू नका, शहराबाहेरून येणारी वाहने पार्किंगच्या ठिकाणी शिस्तबद्धरीत्या पार्क करावी. माता-भगिनींची काळजी घ्यावी. मोर्चात लहान मुले येणार असतील तर त्यांच्या खिशात पालकांनी आपला मोबाइल नंबर लिहून ठेवला पाहिजे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com