#MarathaKrantiMorcha माढा येथे ठिय्या आंदोलन

किरण चव्हाण
मंगळवार, 24 जुलै 2018

मोर्चात माढा तालुक्यातील हजारो सकल मराठा समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते. शहरातून निघालेल्या मोर्चाचे माढा तहसील कार्यालयाचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण तातडीने मिळावे अशी मागणी भाषणातून केली.

माढा : माढा तालुक्यातील सकल मराठा समाजाने माढा तहसील कार्यालयावर ठोक मोर्चा काढून ठिय्या आंदोलन सुरु केले असून, माढा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. माढयातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सकाळी अकरा वाजता माढा शहरातील मुख्य रस्त्यावरुन मोर्चाला सुरवात झाली. 

मोर्चात माढा तालुक्यातील हजारो सकल मराठा समाजातील महिला पुरुष सहभागी झाले होते. शहरातून निघालेल्या मोर्चाचे माढा तहसील कार्यालयाचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी अनेकांनी मराठा समाजाला आरक्षण तातडीने मिळावे अशी मागणी भाषणातून केली. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी काकासाहेब शिंदेना श्रध्दांजली वाहण्यात आली.

काकासाहेब शिंदेच्या वारसांना सरकारी नोकरी द्यावी. वारसांना तातडीने आर्थिक मदत करण्याची मागणी आंदोलकांनी केली. यावेळी तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील सकल मराठा समाजातील लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित  होते. तालुक्यातील माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, पिंपळनेर, लऊळ यासह अनेक गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. पंढरपूरहून परतीचा प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी आंदोलकांनी घेतली.

Web Title: Maratha Kranti Morcha Madha Thiyya Agitation