Maratha Kranti Morcha : पालकमंत्र्यांनी पाटीलकी पणाला लावावी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मराठा आरक्षणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपली पाटीलकी पणाला लावावी, असे आवाहन शिवाजी पेठेतर्फे आज करण्यात आले. प्रसंगी पालकमंत्र्यांच्या दारात उपोषणाचा इशाराही यानिमित्त देण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी शिवाजी पेठेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला. जल्लोषी वातावरणात मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. तेथे पेठकऱ्यांची घणाघाती भाषणे झाली. रविकिरण इंगवले म्हणाले, ‘‘तीन जानेवारीच्या आंदोलनात आमदार राजेश क्षीरसागर आणि आपण स्वतःहून पुढाकार घेतला. आम्ही दोघांनी मिळून खिंड लढविली.

आरक्षणासाठी पेठेचा मोर्चा निघणे आवश्‍यक होते. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला. शिवाजी पेठेत उद्रेक झाला की तो राज्यात पसरतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. चंद्रकांत पाटील यांच्या बदनामीची सुपारी कुणी तरी घेतली आहे. कुणी तरी यामागे छुपा रुस्तम आहे. पाटील यांनी आरक्षणाच्या प्रश्‍नात लक्ष घालावे; अन्यथा त्यांच्या दारात उपोषण करावे लागेल.’’

माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, ‘‘राज्यभरात ५८ मोर्चे शांततेत निघाले. आरक्षणासाठी ३२ जणांनी आत्महत्या केली, तरी शासनाचे डोळे उघडायला तयार नाहीत. ९०, ९५ टक्के गुण मिळाले तरी मराठ्यांच्या मुलांना प्रवेश मिळू शकत नाही. आरक्षण आमच्या हक्काचे आहे आणि ते द्यावेच लागेल. आपण छत्रपतींचे मावळे आहोत. त्यामुळे आत्महत्या करायची नाही. जगायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे जगा आणि मरायचे असेल तर संभाजीराजेंचे बलिदान डोळ्यांसमोर ठेवा. ‘सिंघम’मध्ये बाजीराव सिंघमची जशी सटकते तसे आता आरक्षण न मिळाल्यास शिवाजी पेठेची सटकल्याशिवाय राहणार नाही.’’

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, ‘‘दोन-चार चेहरे म्हणजे मराठा असे चित्र निर्माण झाले होते, ते मोडित काढण्याचे काम आजच्या मोर्चाने केले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, मराठा मरत नाही तो मारतो. शासनाने दखल न घेतल्यास मी सर्व गोष्टींचा त्याग करेन.’’

अजित राऊत म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी या प्रश्‍नात तातडीने लक्ष घालावे. पालकमंत्री पाटील यांनी आरक्षणासाठी पाटीलकी पणाला लावावी. आजचा मोर्चा शांततेत आहे. आरक्षणाचा निर्णय न झाल्यास उद्रेक मोर्चा काढण्याची वेळ शासनाने आणू नये.’’ आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, ‘‘मराठा समाज आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुराव्यांचा अभ्यास करून अधिवेशनात ठराव करावा. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलनाची धग कमी होणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे. प्रसंगी लोकप्रतिनिधीपदाचा त्याग करून मंत्रालयावर चाल करून जावे लागले तरी चालेल.’’

महापौर शोभा बोंद्रे यांनी शासनाने मागणीची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली. माजी महापौर सई खराडे म्हणाल्या, ‘‘शिवाजी पेठेत काठी आपटली की तिचा आवाज राज्यभर येतो. या आवाजाची शासनाने दखल घ्यावी.’’ सुजित चव्हाण यांनी मोर्चा शांततेत पार पाडल्याबद्दल आभार मानले.

देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आणि आमदार चंद्रदीप नरके यांनी पदाच्या त्यागाची भाषा न करता प्रत्यक्ष त्याग करून दाखवावा. 
- शोभा बोंद्रे, महापौर

Web Title: Maratha Kranti Morcha Maratha Reservation Agitation Shivaji Peth