Maratha Kranti Morcha विशेष अधिवेशन सप्टेंबरमध्ये घ्या; आमदारांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करतील. त्या भेटीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतील, त्यावर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, असा निर्णय सकल मराठा समाजाने आज आयोजित केलेल्या आमदार, खासदारांच्या बैठकीत झाला. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. 

कोल्हापूर - मराठा समाजाच्या आरक्षणावर चर्चा करण्यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घ्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे जम्बो शिष्टमंडळ मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. त्याचे नेतृत्व खासदार राजू शेट्टी करतील. त्या भेटीत मुख्यमंत्री जी भूमिका मांडतील, त्यावर सकल मराठा समाजाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे, असा निर्णय सकल मराठा समाजाने आज आयोजित केलेल्या आमदार, खासदारांच्या बैठकीत झाला. शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. 

मराठा आरक्षणाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला असून मराठा तरुण आता ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. नोव्हेंबरपर्यंत ते वाट पाहणार नाहीत. त्यामुळे शासनाने सप्टेंबरमध्ये तातडीने विशेष अधिवेशन घ्यावे. मराठा आरक्षण कसे देणार, ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाचा अंतर्भाव कसा करणार, हे मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या अधिवेशनात सांगावे, शासनाने ३१ ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करावी; अन्यथा चार सप्टेंबरला आम्ही कोल्हापुरातून हजारो गाड्या घेऊन मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन करू. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करून अरबी समुद्रात आमच्या मागण्यांच्या निवेदनांचे विसर्जन करू. या वाहनांच्या मोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील सर्व आमदारांनी करावे, असा प्रस्ताव सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी बैठकीमध्ये ठेवला. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करणे आवश्‍यक आहे. यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यावर जिल्ह्यातील सर्व आमदारांनी एकत्र येऊन मुख्यमंत्र्यांना अधिवेशन घेण्याबाबत निवेदन देऊ या. राज्यातील सर्व आमदारांनी एकत्र यावे.’’ 

राजू शेट्टी म्हणाले, ‘‘सर्व आमदारांनी एकत्र येणे आवश्‍यक आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होणार आहे. आंदोलनकर्त्यांनी सर्व आमदार आणि खासदारांपर्यंत हा निरोप द्यावा. मंगळवारी आमदार, खासदारांचे जम्बो शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू. त्यांच्याकडून विशेष अधिवेशनाचे आश्‍वासन घेऊन आंदोलकांना कळवू.’’

आमदार हाळवणकर म्हणाले, ‘‘आरक्षणाची मागणी विधानसभेत सर्वात पहिल्यांदा मी केली होती. मूक मोर्चा असेल किंवा अन्य कोणतेही आंदोलन, आम्ही योगदान दिले आहे. मात्र, नऊ ऑगस्टचे आंदोलन मुख्यमंत्री आणि सरकारच्या विरोधात असल्याने आम्ही यात आलो नाही. मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरअखेर आरक्षण जाहीर करण्याचे लेखी आश्‍वासन मुंबईमधील आंदोलकांच्या बैठकीत दिले. लेखी आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करणे आवश्‍यक आहे. आपल्याला प्रश्‍न सोडवायचा आहे. विशेष अधिवेशन कधी बोलवायचे, हेदेखील मुख्यमंत्री लेखी देतील; पण याच महिन्यात पाहिजे, असा आग्रह चुकीचा आहे. या आश्‍वासनानंतर आंदोलकांनी अहंकार न बाळगता आंदोलन स्थगित करणे आवश्‍यक आहे.’’

मंत्रालयावर चारला वाहनांचा मोर्चा
दिलीप देसाई म्हणाले, ‘‘आमदारांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री काय लेखी आश्‍वासन देतात. त्यावर सकल मराठा समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. तोपर्यंत दसरा चौकातील ठिय्या आंदोलन सुरूच राहील व चार सप्टेंबरचा वाहनांचा मोर्चाही कायम असेल.’’

Web Title: maratha kranti morcha maratha reservation agitation Special Session MLA