Maratha Kranti Morcha : बाजारपेठेत बंदचे वातावरण, शहरातील व्यवहार सुरळीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत दोन ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. नवी पेठेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बंदचे वातावरण दिसून आले. नवी पेठेतील दगडफेकीची किरकोळ घटना वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली असली तरी शहरातील बाकीचे व्यवहार सुरळीत चालू होते.

सोलापूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी अकरा ते दुपारी एक यावेळेत दोन ठिकाणी ठिय्या आंदोलन झाले. नवी पेठेसह प्रमुख बाजारपेठांमध्ये बंदचे वातावरण दिसून आले. नवी पेठेतील दगडफेकीची किरकोळ घटना वगळता कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. काही दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली असली तरी शहरातील बाकीचे व्यवहार सुरळीत चालू होते.

महाराष्ट्र बंदच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून सोलापूर बस स्थानकातून सोडण्यात आल्या नाहीत. सकाळी साडेअकरा वाजता संभाजी पुतळा परिसरात मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून पोलिसांनी बॅरीगेट्‌स लावून वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली होती. घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी बोटाला कापून घेऊन शंकराच्या पिंडीवर रक्ताचे थेंब टाकून आरक्षणाच्या मागणीकडे लक्ष वेधले. शिवाजी चौकापासून अलीकडे सर्व व्यवहार सुरळीत असल्याचे दिसून आले. काही दुकानदार, हॉटेल चालक दक्षता म्हणून शटर बंद करून बाहेर थांबून होते. तर काहीजण अर्धे शटर चालू ठेवून नियमित व्यवहार करीत होते. दुपारी एकच्या सुमारास नवी पेठेतील एका दुकानावर किरकोळ दगडफेक झाली. पोलिसांनी लागलीच धाव घेऊन तणावावर नियंत्रण आणले.

शिवाजी चौक, संभाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सात रस्ता, विजापूर नाका, बाळीवेस, मधला मारुती यासह प्रमुख 46 ठिकाणी पोलिसांनी सुरक्षेसाठी फिक्‍स पॉइंट लावले होते. सोलापुरातील मराठा समाजाने 30 जुलै रोजी बंद पाळल्याने गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नसल्याचे आधीच सांगण्यात आले होते. जुना पूना नाका परिसरातील संभाजी पुतळ्यासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. शाळा चालू होत्या, पण विद्यार्थी न आल्याने मधल्या सुट्टीनंतर काही शाळा सोडून देण्यात आल्या.

- बसस्थानक परिसरात शुकशुकाट

- महामार्गांवर पोलिसांची गस्त

- बाजारपेठेत काही दुकाने ठेवली बंद

- शहरातील सर्व व्यवहार सुरळीत 

- एसटी, सिटी बस बंद असल्याने प्रवाशांचे हाल

- संभाजी चौक, शिवाजी चौकासह 46 ठिकाणी पोलिसांचे फिक्‍स पॉइंट 

Web Title: Maratha Kranti Morcha : Market close in solapur