Maratha Kranti Morcha :पंढरपूरमध्ये बंदला शंभर टक्के प्रतिसाद

अभय जोशी
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

पंढरपूर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालये देखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर पेटवण्याच्या घटना घडल्या.

पंढरपूर: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या पंढरपूरला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपआपली दुकाने बंद ठेवली होती. शाळा व महाविद्यालये देखील बंद होती. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकात काही वेळ ठिय्या आंदोलन करण्यात आले. दोन, तीन ठिकाणी टायर पेटवण्याच्या घटना घडल्या.

आज (गुरुवार) सकाळ पासून शहरातील सर्वच भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे शहर कडेकोट बंद होते. एसटी आगारातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे दर महिन्याच्या एकादशीला श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्याप्रमाणे दोन दिवसांपासून शहरात भाविकांची गर्दी वाढली होती. आज व्दादशी दिवशी बंद मुळे एस.टी वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात आल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांना पंढरपुरातून परत गावी जाण्यात अडचण निर्माण झाली. अशा परिस्थितीत बहुतांष भाविकांनी परतीच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी केली होती.

सकाळी शिवाजी चौकात मराठा समाजबांधवांनी एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी मोटारसायकल वरुन शहरातून फिरुन शांततेचे आवाहन केले. तथापी काही कार्यकर्ते गटागटाने शहरात फिरत होते. शहरात कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अशा ही परिरस्थितीत नाथ चौक आणि सरगम चौकात काही कार्यकर्त्यांनी टायर जाळून आंदोलन केले. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहराकडे येणाऱ्या सर्वच रस्त्यांवर कार्यकर्त्यानी चक्का जाम आंदोलन करत रस्ते अडवून धरल्याने अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

अन्नछत्रामुळे भाविकांची सोय
शहरातील सर्व हॉटेल तसेच खोक्‍यांमधून चहा विक्री करणारे आणि हातगाड्यांवर नाष्टा विक्री करणारी विक्री केंद्रे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे वारकऱ्यांचे हाल झाले. अशा परिस्थितीत श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीने अन्नछत्राव्दारे भाविकांची सोय केली. अन्नछत्राची वेळ वाढवून जास्तीतजास्त भाविकांची जेवणाची सोय समितीच्या वतीने करण्यात आली. सकाळी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसरातील कार्यकर्त्यांनी पोहे वाटप करुन भाविकांची सोय केली. त्यामुळे देखील भाविकांना मदत झाली.

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी सचिन ढोले यांना विचारले असता ते म्हणाले, आज भाविकांच्या सोईसाठी अन्नछत्र सकाळी 11 पासून सांयकाळी चार वाजे पर्यंत सुरु ठेवले होते. सुमारे आठ ते नऊ हजार भाविकांना त्याचा लाभ झाला.

काही कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद
काही कंपन्यांनी शासनाच्या आदेशानुसार दक्षता म्हणून इंटरनेट सेवा बंद केली होती. त्यामुळे दररोज व्हाटस्‌ अप, फेसबुक वर व्यस्त असणाऱ्या मंडळींची कमालीची गैरसोय झाली. त्याच बरोबर मावा , गुटखा आणि तंबाखू विक्री करणाऱ्या टपऱ्या बंद राहिल्याने संबंधितांची देखील पंचाईत झाली.

Web Title: Maratha Kranti Morcha : Pandharpur gets 100 percent response