‘मराठा क्रांती’च्या चक्का जाममुळे जिल्हा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सांगली - मराठा समाजाच्या विविध  मागण्यांकडे शांततामय मोर्चाच्या माध्यमातून मागण्या करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित चक्का जाममुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प राहिले. सर्व प्रमुख रस्त्यांवर कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केले. सरकारचा निषेध केला. पोलिसांनी अटक करून ताब्यात घेऊन सोडून दिले. सहा मार्चपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला.

सांगली - मराठा समाजाच्या विविध  मागण्यांकडे शांततामय मोर्चाच्या माध्यमातून मागण्या करूनही सरकारने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ आज  मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित चक्का जाममुळे जिल्ह्यातील व्यवहार ठप्प राहिले. सर्व प्रमुख रस्त्यांवर कार्यकर्त्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन केले. सरकारचा निषेध केला. पोलिसांनी अटक करून ताब्यात घेऊन सोडून दिले. सहा मार्चपर्यंत सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर मंत्र्यांना राज्यात फिरू न देण्याचा इशारा देण्यात आला.
सांगलीत अंकली फाटा, लक्ष्मी फाटा, वसंतदादा साखर कारखाना येथे आंदोलन झाले. अंकली फाटा आणि लक्ष्मी फाटा येथे चक्का जाममुळे कोल्हापूर व इस्लामपूर मार्गावर वाहतूक ठप्प झाली. लक्ष्मी फाटा येथे अर्ध्या तासाच्या आंदोलनानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेऊन सोडून दिले.  

रस्त्यावर बसून कार्यकर्त्यांनी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत आरक्षण तातडीने लागू करण्याची मागणी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक करून ताब्यात घेतले. मोहिते मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांना बसवले. नंतर सोडून दिले. त्यात पंडितराव पाटील, अमोल सूर्यवंशी, उदय कदम, गिरीश चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.

अंकली फाट्यावरही शंभर कार्यकर्ते सहभागी झाले.  अर्धा तास रास्ता रोको केला. कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटक केली आणि वरद मंगल कार्यालयात नेले. तेथे तासभर थांबवण्यात आले. नंतर सोडून दिले. संजय देसाई, डॉ. संजय पाटील, महेश खराडे, विजय भोसले, सतीश साखळकर, सर्जेराव पाटील, योगेश पाटील, श्रीरंग पाटील, बाळासाहेब सावंत, प्रदीप बर्गे उपस्थित होते.

कारखाना चौकात ३६ कार्यकर्ते ताब्यात
वसंतदादा कारखान्यासमोरील चौकात सकाळपासून पोलिस बंदोबस्त होता. संजयनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीपकुमार जाधव आणि अधिकारी, कर्मचारी 
तैनात होते. 

सकाळी ११ नंतर नगरसेवक उमेश पाटील, गौतम पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, ए. डी. पाटील, अक्षय पाटील आदींसह कार्यकर्ते जमले. त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलनापूर्वीच ३६ जणांना ताब्यात घेतले. त्यांची नोंद घेऊन सोडून दिले.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
चक्का जाम आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस  अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात अधिक संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी सकाळपासून तैनात केले होते. अप्पर अधीक्षक, उपाधीक्षक- ६, पोलिस  निरीक्षक- २३, सहायक निरीक्षक ४३,  उपनिरीक्षक- ८४, पोलिस कर्मचारी- २४०० असा अडीच हजारांवर पोलिसांचा बंदोबस्त होता. ५२ पोलिस वाहने, लाठी, हेल्मेट, ग्रॅस ग्रेनेट, गॅस सेल, गॅसगन, रायफल्स, कार्बाईन गन, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, एसएलआर गन, एके ४७, प्लास्टिक बुलेट, रबर बुलेट, सिनगार्ड, ढाल, रुग्णवाहिका, दंगलग्रस्तांना रोखण्यासाठीचे वज्र वाहन अशी यंत्रणा सज्ज होती. जिल्हा विशेष शाखा, गुप्तवार्ता शाखा, दहशतवादविरोधी पथक, जिल्हा नक्षल सेल, सुरक्षा शाखा, गुन्हे अन्वेषण पथक यांच्या मदतीने  चक्का जामची माहिती संकलित केली. 

मंत्र्यांना फिरू देणार नाही
मुंबई बैठकीत सहभागी संजय देसाई म्हणाले, ‘‘सरकारला इशारा दिला आहे. काहींनी मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजच्या आंदोलनाने समाज एक असल्याचा संदेश मिळाला. आजच्या आंदोलनात सहभागी मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व करतील. तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर कार्यकारिणी तयार करण्यात येईल. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर ६ मार्चनंतर मंत्र्यांना फिरू देणार नाही. कामही करू देणार नाही. त्यांचे जाहीर अथवा बंदिस्त कार्यक्रम उधळून लावू.

Web Title: maratha kranti morcha sangli