Maratha Kranti Morcha :सोलापूर : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मूक ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन मूक आणि ठिय्या असले तरीही खबरदारीची उपाय योजना म्हणून शहर पोलिसांच्यावतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

मराठा आरक्षणासाठी जीव गमावलेल्या मराठा बांधवांचे छायाचित्र आंदोलनस्थळी लावण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस अभिवादन करून या आंदोलनाची सुरवात झाली. आंदोलनात सहभागी झालेल्या बहुतांश महिलांनी काळ्या साड्या, काळे ड्रेस घातले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या मराठा समाज बांधवांनी व भगिनींनी "मराठा आरक्षण' लिहिलेली काळी पट्टी तोंडावर बांधली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर काळी पट्टी असलेल्या प्रतिमाही आंदोलनकर्त्यांनी हातात घेतल्या होत्या. 

महापौर शोभा बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, कॉंग्रेसचे प्रकाश वाले यांच्यासह विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून मागणीला पाठिंबा दिला. यावेळी माजी महापौर मनोहर सपाटे, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते बळिराम साठे, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, माऊली पवार, सुहास कदम, प्रवीण डोंगरे, शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेवक विनोद भोसले, प्रा. जी. के. देशमुख, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते. 

मागण्या स्पष्ट निवेदन कशाला 
आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी प्रांताधिकारी शिवाजी जगताप व उत्तर सोलापूरचे तहसीलदार आंदोलनस्थळी आले होते. तोपर्यंत मूक ठिय्या आंदोलन झाले. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मागण्या स्पष्ट आहेत. यापूवीच मागण्यांचे निवेदन अनेकवेळा दिलेले आहे. त्यामुळे आजच्या आंदोलनातून पुन्हा त्या मागण्या मांडण्याऐवजी आमच्या मागण्या शासनाकडे आहेत. शासनाने त्या पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा माऊली पवार यांनी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha :Solapur: Silent Movement in front of the office of the Collector Office