कुणबी दाखल्यासाठी ‘मराठ्यां’ची धावपळ

विलास साळुंखे
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

भुईंज - गट व गणांत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भुईंज गट प्रथमच खुला प्रवर्ग सोडून इतर मागास वर्ग समाजासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुकांचे सुरवातीला काळंवडलेले चेहरे आता कुणबी दाखला मिळवून खुलायला लागले आहेत.

भुईंज - गट व गणांत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच सुरू असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. भुईंज गट प्रथमच खुला प्रवर्ग सोडून इतर मागास वर्ग समाजासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे खुल्या गटातील इच्छुकांचे सुरवातीला काळंवडलेले चेहरे आता कुणबी दाखला मिळवून खुलायला लागले आहेत.

भुईंज गट पूर्वीपासून काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने २००७  मध्ये दोन्ही गण आणि गटात ‘राष्ट्रवादी’ने विजय मिळवून काँग्रेसला धक्का दिला.  मात्र, २०१२ मध्ये काँग्रेसच्या उमेदवार राजनंदा जाधवराव यांचा विजय झाला तर त्याच निवडणुकीत पाचवड गणात काँग्रेसच्या पदरी पुन्हा पराभवच आला. अशा परिस्थितीत २०१७ मध्ये होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय होणार, याबाबत उत्सुकता आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे वाई पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद शिंदे यांनी उमेदवारीसाठी रान उठविले आहे, तर जिल्हा परिषदचे माजी सदस्य दिलीप बाबर यांनी सायकल यात्रेला सुरवात केली होती. पण, गट इतर मागास वर्ग समाजासाठी आरक्षित झाल्याने शिंदे यांना बसकन मारावी लागली तर बाबर यांनी सायकल पार्क केली. दोन्ही गटांकडून इतर मागास वर्ग समाजातील उमेदवाराची चाचपणी होत होती. मात्र, अचानक शिंदे यांनी कुणबी जातीचा दाखला मिळवल्याचा व बाबर दाखल्या मिळवण्याच्या रांगेत असल्याची चर्चा सुरू झाल्याने जिल्हा परिषद गटात कुणबी समाजातीलच उमेदवार रिंगणात असणार, हे नक्की झाले आहे. दाखला मिळविण्याच्या प्रक्रिया यशस्वी पार पडल्यानंतर ‘राष्ट्रवादी’त उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. तसेच राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक मोहन चव्हाण हेही भुईंज गटातून टोकाचे इच्छुक आहेत.

राष्टवादीत एकीकडे रस्सीखेच असताना दुसरीकडे काँग्रेसमध्ये मात्र, इतर मागास वर्ग समाजातील कार्यकर्ते उमेदवारीसाठी प्रबळ आहेत. काँग्रेसकडून जयवंत पिसाळ, अरुणशेठ वालेकर, चेतन गाडे, राहुल शेवते, प्रवीण रोकडे यांच्यासह अनेक नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. काँग्रेसमधील कोणताच मराठा कार्यकर्ता अद्यापपर्यंत तरी कुणबी जातीच्या दाखला काढण्यासाठी उत्सुक नाही. 

मधुकर शिंदे, भय्यासाहेब जाधवराव, शेखर भोसले-पाटील, विलासराव जाधवराव, अर्जुनराव भोसले, एम. आर. भोसले हे काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते पदासाठी कुणबी दाखला काढणार नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कुणबी दाखला असणारा उमेदवार शोधताना काँग्रेसला कसरत करावी लागणार असून, राष्ट्रवादीने इतर मागास प्रवर्गातील उमेदवार दिला तरच काँग्रेसकडून इतर मागास प्रवर्गातील उमेदवार दिला जाण्याची शक्‍यता आहे. कुणबी विरुध्द इतर मागास प्रवर्ग अशी लढत झाली तर कुणबी उमेदवारांचे पारडे जड राहण्याची शक्‍यता असल्यामुळे काँग्रेसला कुणबी दाखला मिळवणारा उमेदवार शोधण्यासाठी ठोस पावले उचलावी लागणार आहेत. 
भुईंज गणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून रजनी सुधीर भोसले-पाटील व श्रुतिका सुजितसिंह जाधवराव या दोघी इच्छुक आहेत. काँग्रेसने गटाची उमेदवारी भुईंज गावात दिली तर भुईंज गणातील उमेदवारी दुसऱ्या गावात द्यावी लागणार आहे. यापूर्वी गावातच दोन्ही उमेदवार देवून आलेला अनुभव गाठीशी असल्याने काँग्रेस पुन्हा तशी चूक करेल असे वाटत नाही. पण, गटाची उमेदवारी बाहेर गावात दिली तर भुईंज गणाच्या उमेदवार भुईंज ग्रामपंचायतच्या उपसरपंच अनुराधा भोसले, स्मितादेवी भोसले-पाटील असू शकतील. जिल्हा परिषद सदस्या राजनंदा जाधवराव याही पंचायत समितीच्या उमेदवार झाल्यास आश्‍चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे.

पाचवड गणातही कुणबी महिला उमेदवार! 
पंचायत समितीचा पाचवड गण इतर मागास प्रवर्ग महिला राखीव असल्यामुळे या ठिकाणीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणबी दाखल्यावर महिलेला संधी मिळण्याची चर्चा आहे, तर काँग्रेसच्या गोटात मात्र शांतताच आहे.

Web Title: maratha kunabi certificate