एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - "एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी, शिवराय मनामनांत, शिवजयंती घराघरांत' अशा घोषणा देत सकल मराठा मावळ्यांनी शहरातून आज मोटारसायकल रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन-तीन शिवजयंती साजरी करण्यापेक्षा रविवारी (ता. 19) होणारी शासकीय शिवजयंतीच सर्वांनी साजरी करावी, असे आवाहन रॅलीद्वारे केले. 

कोल्हापूर - "एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी, शिवराय मनामनांत, शिवजयंती घराघरांत' अशा घोषणा देत सकल मराठा मावळ्यांनी शहरातून आज मोटारसायकल रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीन-तीन शिवजयंती साजरी करण्यापेक्षा रविवारी (ता. 19) होणारी शासकीय शिवजयंतीच सर्वांनी साजरी करावी, असे आवाहन रॅलीद्वारे केले. 

एरव्ही मोटारसायकल रॅली म्हटले की गाड्यांच्या पुंगळ्या काढून, मोठ्याने घोषणा देणे, असा सर्रास प्रकार नजरेस पडतो. मराठा क्रांती मोर्चाने जी शिस्त घालून दिली तिच शिस्त तरुणांनी अंगीकारली आहे. बिंदू चौकातून दुपारी बाराच्या सुमारास रॅलीस सुरवात झाली. तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. शिवजयंतीसंबंधी आवाहन करणारे शंभराहून अधिक फलक त्यांच्या हाती होते. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेत रॅलीस सुरवात झाली. कॉमर्स कॉलेज, दिलबहार तालीम, टेंबे रोड, मिरजकर तिकटी, दैवज्ञ बोर्डिंग, अर्धा शिवाजी पुतळा, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, माळकर तिकटीमार्गे शिवाजी चौकात रॅलीचा समारोप झाला. 

"एकच वारी, एकोणीस फेब्रुवारी' "जगात भारी, एकोणीस फेब्रुवारी' "शिवराय मनामनांत, शिवजयंती घराघरांत' अशा धोषणा देण्यात आल्या. हाती भगवे झेंडे आणि तरुणांच्या सळसळत्या उत्साहात रॅलीचा समारोप झाला. 

रॅलीत मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, मावळा ग्रुपचे उमेश पोवार, विजय पाटील, संदीप बोरगावकर, अनिकेत सावंत, अनिकेत पाटील, सचिन पाटील, सचिन तोडकर, स्वप्नील पाटील, अमोल गायकवाड, रामदास पाटील, कविता कोंडेकर, वंदना आळतेकर, वैशाली महाडिक आदी सहभागी झाले. 

एकजूट कायम ठेवण्याचा प्रयत्न 
शिवजयंतीबाबतीत तिथी आणि तारखेचा वाद उपस्थित करून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचा सकल मराठा समाजाचा आरोप आहे. तीन-तीन वेळा शिवजयंती साजरी करून हा समाज एकसंध राहू नये, असा प्रयत्न आहे. राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी क्रांती मोर्चाचे वादळ निर्माण झाले, त्यातून एकजूट साधली गेली, ती कायम ठेवण्याचा समाजाचा प्रयत्न आहे. 19 फेब्रुवारीला शासकीय शिवजयंती साजरी होते. याच दिवशी सर्व तरुण मंडळांनी जयंती साजरी करावी, असा प्रयत्न आहे.

Web Title: Maratha Rally 19 feb