Maratha Reservation : आंदोलनात योगदान देणाऱ्यांचा होणार सत्कार

Maratha Reservation : आंदोलनात योगदान देणाऱ्यांचा होणार सत्कार

कोल्हापूर - मराठा समाजाला आर्थिक, सामाजिक, मागास गटातून आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. मराठा समाजाला आरक्षण मिळाले. विशेष म्हणजे, कोल्हापुरातील मराठा शिलेदारांनीही नेटाने ४२ दिवस आंदोलन करून राज्यात आदर्श ठरावे, असे आंदोलन केले. यासाठीच सकल मराठा समाजातर्फे आरक्षणात ज्यांनी योगदान दिले. अशा सर्वसामान्य घटकांचा जाहीर सत्कार होणार आहे, अशी माहिती आज सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेत दिली. मुस्लिम बोर्डिंग येथे सकल मराठा समाजातर्फे बैठक झाली.

दिलीप पाटील म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा, आंदोलने यशस्वी केली. यामुळे आरक्षणाची मागणी मान्य झाली. म्हणूनच सर्वांना एकत्र आणून हा सत्कार करण्यात येईल.’’ निमंत्रक जयेश कदम यांनी प्रमुख ठरावाचे वाचन केले. 

सीमाभागातील नागरिकांना आमंत्रण दिले जाईल. मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे सरकारने काढून घेण्यास भाग पाडणे. सारथी संस्था ही पुणे येथे आहे. या संस्थेचे मुख्य केंद्र कोल्हापूरला व्हावे, यासाठी सरकारला भाग पाडण्यात येईल. सर्वोच्च न्यायालय येथे न्यायालयीन लढाईसाठी वकील नेमण्यात येईल. कोल्हापूरच्या जिल्हा पोलिस प्रशासनाचा सत्कार करण्यात येईल, याचा समावेश आहे. जाहीर सत्काराची तारीख, वेळ, ठिकाण, सत्काराचे स्वरूप येत्या काही दिवसांत जाहीर केले जाईल, असे सांगितले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते सत्कार होतील.

बैठकीला बाजीराव चव्हाण, हर्षल सुर्वे, इंद्रजित सावंत, उत्तम कोराणे, स्वप्नील पार्टे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष गुलाबराव घोरपडे, मधुकर बिरंजे, शाहीर दिलीप सावंत, राजू सावंत, विकी जाधव, महादेव पाटील, उत्तम पोवार, संजय देसाई, प्रताप वरुटे-नाईक, शुभम शिरहट्टी, सुनील पाटील, संजय पोवार-वाईकर, किशोर घाटगे, राजू लिंग्रस, आर. के. पाटील, मारुती जाधव आदी उपस्थित होते.

प्रमुख सत्कारमूर्ती असे : 
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू महाराज छत्रपती, खासदार संभाजीराजे छत्रपती, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नीतेश राणे यांचा जाहीर सत्कार करण्यात येईल. याबरोबर खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार तसेच कोल्हापुरातील माध्यमातील सर्व संपादक, पत्रकार, छायाचित्रकार, तसेच महापौर, नगरसेवक, माजी महापौर, माजी नगरसेवक आणि शाहीर दिलीप सावंत यांना मानाचे चांदीचे कडे देऊन सत्कार केला जाईल. मागास आयोग विधी समिती सल्लागार, निवृत्त न्यायाधीश के. डी. पाटील, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, विनायक सूर्यवंशी, राजू मेवेकरी यांचा सत्कार होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com