#MarathaKrantiMorcha सातारा जिल्ह्यात आजपासून "बंद' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जुलै 2018

सातारा - "करो या मरो', असा निर्धार करत छत्रपतींच्या राजधानीतही मराठा तरुणाईने आज आंदोलनाची मशाल पेटविली. जिल्हा समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत आरक्षणासाठी उद्यापासून जिल्हा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळी नऊला राजवाडा येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरवात होणार आहे. 

सातारा - "करो या मरो', असा निर्धार करत छत्रपतींच्या राजधानीतही मराठा तरुणाईने आज आंदोलनाची मशाल पेटविली. जिल्हा समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत आरक्षणासाठी उद्यापासून जिल्हा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळी नऊला राजवाडा येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला सुरवात होणार आहे. 

वारकऱ्यांच्या परतीचा दिवस असल्याने आजच्याऐवजी उद्या (बुधवारी) "जिल्हा बंद'चा निर्णय घेण्यात आला होता. याच्या नियोजनासाठी येथील कल्याण रिसॉर्टमध्ये समितीची बैठक झाली. या वेळी युवक व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवकांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या. शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मुंबई मोर्चावेळी देण्यात आलेल्या एकाही घोषणेची पूर्तता करण्यात आलेली नाही. ओबीसी समाजाप्रमाणे कोणत्याच सवलती मिळत नाहीत. 50 टक्के शुल्क भरून प्रवेश मिळत नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज मिळत नाही. त्यातच मेगा भरतीचा घाट घातला आहे. आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्याचे सोडून समाजाची फसवणूक करण्याचे काम शासनाकडून होत आहे. त्यामुळे आता आपल्याला "करो या मरो'ची भूमिका घ्यावी लागणार असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. 

राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असताना राजधानी शांत बसता कामा नये, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी त्यांनी केली. युवकांच्या भावनांची दखल घेत ठोस आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी उद्या (बुधवार) राजवाड्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याची मागणी या वेळी युवक व महिलांनी केली. सरपंचांपासून खासदारांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी या मोर्चाला उपस्थित राहावे; अन्यथा मते मागायला समाजाकडे यायचे नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. तसेच आंदोलनाला उपस्थित न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीम हातात घेणार असल्याचा इशारा या वेळी युवकांनी दिला. 

आजच्या मोर्चाविषयी... 
राजवाड्यावरून राजपथमार्गे सकाळी नऊ वाजता महामोर्चा 
महामोर्चात चारचाकी नाही, दुचाकी रॅली निघणार 
शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद राहणार 
एसटी अथवा वाहनांवर दगडफेक होणार नाही 
जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन होणार 
ठिय्या आंदोलनात दररोज एक तालुका सहभागी होणार 
"बंद'ला रिपब्लिकन ब्ल्यू फोर्सचे दादासाहेब ओव्हाळ यांचा पाठिंबा 
महामोर्चात कोणीही आक्षेपार्ह घोषणा देणार नाही 
कोणताही समाज, जातीविषयी आक्षेपार्ह टीका नाही 

ठिकठिकाणी "बंद', मोर्चे 
सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या राज्य बंद आंदोलनाला सातारा शहर वगळता जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांत प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी काकासाहेब शिंदे या युवकाला श्रद्धांजली वाहून ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात आला. 

काल रात्री जुना आरटीओ चौकात शिवशाही बसची काच फोडण्यात आली. सकाळी वाढे फाटा येथे महामार्ग अडविण्यात आला. वाई, कातरखटाव, दहिवडी, फलटण, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्‍यांत शंभर टक्के बंद पाळण्यात आला.

Web Title: #MarathaKrantiMorcha band in satara district