मुख्यमंत्री बदलाच्या केवळ अफवाच: चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक निर्णयपद्धती आणि पारदर्शक कारभारामुळे काही जणांची दुकानदारी बंद पडल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची कारस्थाने सुरू असली, तरी अशा मंडळीची सद्दी संपल्याने अशा अफवांना आपल्या लेखी काही अर्थ नसतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

मिरज : गेल्या चार वर्षांतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले निर्णय अतिशय चांगले आहेत. ते ब्राह्मण असल्याने मराठा आरक्षणास त्यांचा विरोध असल्याची पद्धतशीर अफवा पसरवली जात आहे. ते स्वतः पूर्वीपासूनच मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत.

त्यामुळे मुख्यमंत्री बदलाचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

एका कार्यक्रमासाठी ते आले होते. पाटील म्हणाले, ""मराठा समाजासाठी सरकारने जे निर्णय घेतले त्यातून मुख्यमंत्र्यांची इच्छशक्‍ती दिसते. त्यांनी शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत, इबीसी सवलत मर्यादा आठ लाखांची करण्यासह 680 शैक्षणिक प्रवेशांसाठी प्रवेश घेताना शुल्कमाफी, उद्योग व्यवसायांना कर्जे, अशा अनेक विषयांवर धाडसी निर्णय घेतले आहेत. तालुक्‍याच्या ठिकाणी वसतिगृहांबाबत तर ते स्वतः आजच सकाळी माझ्याशी बोलले आहेत. असे असताना ते मराठाविरोधात असल्याच्या अफवा पसरविणे हे चुकीचे आहे. ते चांगले निर्णय घेणारे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या बदलाची कसलीही चर्चा नाही. या वेळी मराठा आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्रिपदी आपल्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या प्रश्‍नावर त्यांनी असे अजिबात काही नसल्याचे ठामपणे सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची सकारात्मक निर्णयपद्धती आणि पारदर्शक कारभारामुळे काही जणांची दुकानदारी बंद पडल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारची कारस्थाने सुरू असली, तरी अशा मंडळीची सद्दी संपल्याने अशा अफवांना आपल्या लेखी काही अर्थ नसतो, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. 

Web Title: MarathaKrantiMorcha Chandrakant Patil talked about Devendra Fadnavis and CM post