#MarathaKrantiMorcha 'मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे नको'

अभय जोशी
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

पंढरपूरः मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाच्या कारणावरुन मराठा समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये, यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावीत. खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत, अशी मागणी पंढरपूर तालुक्‍यातील चार प्रमुख नेत्यांनी आज (सोमवार) पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांना भेटून केली. या मागणीच्या निमित्ताने तालुक्‍यातील एकमेकाचे राजकीय विरोधक काही वेळासाठी का होईना एकत्र आले होते.

आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, समन्वयक मोहन अनपट यांनी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांची आज भेट घेतली. यावेळी तालुक्‍यातील आंदोलन आणि पोलिसांकडून करण्यात येत असलेली कारवाई या विषयी चर्चा झाली.

पोलिस अधिक्षक श्री. पाटील यांना लेखी निवेदन ही देण्यात आले आहे. त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मराठा समाजास आरक्षण मिळावे व इतर मागणीसाठी सध्या महाराष्ट्रभर सकल मराठा समाजाचे आंदोलन चालू आहे. त्याचाच भाग म्हणून पंढरपूर येथे ही आंदोलन करण्यात आलेले होते. 2 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट दरम्यान तहसिल कार्यालय समोर समाजबांधवांनी शांततेच्या मार्गाने ठिय्या आंदोलन केले होते. 9 ऑगस्ट रोजी पंढरपूर शहर व तालुक्‍यात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनही पार पडले. आंदोलना दरम्यान पंढरपूर शहर पोलिसात दोन तर तालुका पोलिसात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना अटकही करण्यात आलेली आहे. तर अजूनही काही समाजबांधवांना चौकशीकामी पोलिस ठाण्यात बोलवण्यात येत आहे. त्यामुळे समाजामध्ये भयभीत वातावरण तयार झालेले आहे.

पंढरपूर येथील सकल मराठा समाजाचे आंदोलन शांतता व कायदा सुव्यवस्थेच्या मार्गाने सुरु असताना समाज बांधवांवर झालेल्या कारवाईमुळे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर कलमे रद्द करण्यात यावीत. यापुढील काळात सकल मराठा समाज बांधवांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येऊ नयेत असे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनावर आमदार भारत भालके, आमदार प्रशांत परिचारक, हकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक राजूबापू पाटील, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे, समन्वयक मोहन अनपट, सुधाकर कवडे, दिनकर चव्हाण, विश्‍वनाथ भिंगारे, बाळासाहेब पवार, संदिप पाटील, अविनाश पवार, अमोल कवडे, किशोर कदम, कृष्णात माळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: MarathaKrantiMorcha false acts against Maratha community