#MarathaKrantiMorcha गावोगावी व्यवहार ठप्प, पदयात्रा, ‘रास्ता रोको’

Maratha-Kranti-Morcha-Sangli
Maratha-Kranti-Morcha-Sangli

सांगली - मराठा आरक्षणासाठी गंगापूरच्या काकासाहेब शिंदे याने जलसमाधी घेतली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. मराठा समाजाच्या भावना अधिक तीव्र झाल्या. मराठा क्रांती मोर्चाच्‍या "महाराष्ट्र बंद'च्या हाकेला सांगली जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. मात्र सांगली, मिरज, कुपवाड शहरात महापालिकेसाठी निवडणूक आचरसंहिता असल्याने शहरात वातावरण शांत होते. जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा समाजातील बांधवांनी सरकारचा निषेध करीत कडकडीत ‘बंद’ पाळला. काही ठिकाणी टायर पेटवून रास्ता रोको करण्यात आला; तर कुठे बसवर दगडफेक करण्यात आली. 

तासगावात रॅली, दगडफेक
तासगाव : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे तासगाव शहरासह तालुक्‍यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. मणेराजुरी-वायफळे येथे चौकात टायर्स पेटवून रास्ता रोको करण्यात आला. तासगाव तालुक्‍यात तीव्र पडसाद उमटले. काल रात्री झालेल्या बैठकीत ‘तासगाव बंद’ची हाक देण्यात आली होती. मोटार सायकल रॅली काढून ‘बंद’चे आवाहन करण्यात  येत होते. मणेराजुरी आणि वायफळे येथे ही बंद  पाळण्यात आला. येथे ‘बंद’ला हिंसक वळण लागले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून टायर्स पेटवून रस्ते रोखून धरले. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळित झाली होती. 

वाळव्यात ‘बंद’ला प्रतिसाद
इस्लामपूर - वाळवा तालुक्‍यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यकर्त्यांनी तहसीलदार व पोलिस प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले. तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरात ‘बंद’चे आवाहन करण्यात आले. आझाद चौकात कार्यकर्ते ‘बंद’चे आवाहन करत असताना पोलिसांनी त्यांना अडवले. आंदोलकांकडील ध्वनिक्षेपक काढून घेतला. त्यावरून आंदोलक व पोलिस यांच्यात वाद झाला. उमेश कुरळपकर, दिग्विजय पाटील, सागर जाधव, नगरसेवक शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, विजय महाडिक, आबासाहेब पाटील, महेश भोसले, ॲड. जगदीश जाधव, दिग्विजय मोहिते, उमेश शेवाळे उपस्थित होते. 

वाळवा - ‘बंद’च्या आवाहनाला आज येथे मोठा प्रतिसाद मिळाला. वाळव्यासह आसपासच्या सर्व गावांत व्यवहार दिवसभर ठप्प होते. 

कुरळप - बंद’ला परिसरातील गावांनी आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुरळप सह वशी, लाडेगाव, ऐतवडे बुद्रुक, करंजवडे, चिकुर्डे, ऐतवडे खुर्द, इटकरे, येडेनिपाणी, देवर्डे आदी गावांतील ग्रामस्थांनी सकाळपासूनच आपले व्यवहार बंद ठेवले होते. 

वाघोलीत ‘रास्ता रोको’
कवठेमहांकाळ - कवठेमहांकाळ शहर बंद ठेवून तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा बांधव काकासाहेब शिंदे यांना मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरातून मराठा बांधवांनी फेरी काढली. वाघोलीत ‘रस्ता रोको’ आंदोलन झाले. यावेळी सुशांत शिंदे, प्रमोद चव्हाण, पांडुरंग शिंदे, संदीप मंडले, किरण शिंदे, अनुप शिंदे, संजय गायकवाड, चंद्रकांत शिंदे, पपु शिंदे, राजेश मंडले उपस्थित होते. तालुक्‍यातील खरशिंग, देशिंग, वाघोलीसह काही गावांत बंद पाळण्यात आला. 

पलूस तालुक्‍यात ‘बंद’
अंकलखोप - पलूस तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चातर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्‍यात बंदमुळे गावांगावात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनीसकाळपासून बसस्थानक परिसरात मून व्यापाऱ्यांना ‘बंद’चे आवाहन केले.  रांजणीत सरकारचा निषेध

रांजणी - मराठा क्रांती मोर्चातर्फे रांजणी गाव बंद  ठेवण्यात आले. यावेळी उद्योगपती माधवराव कुलकर्णी, महांकालीचे संचालक जीवनराव भोसले, मार्केट  समितीचे अजित बनसोडे, डॉ. पवार, पतंग यमगर,  संजय भोसले, उदयराजे भोसले, शंकर भोसले यांची भाषणे झाली. 

आष्टा येथे रॅली
आष्टा - बंदला आष्टा शहरात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. संतप्त तरुणांनी दोन दुकानांवर दगडफेक केली. शहरातून मोटरसायकल रॅली निघाली. सकाळी नऊ वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते संभाजी चौकात जमा झाले. दुकाने बंदचे आवाहन केले. शहरातून मोटरसायकल रॅली निघाली. संभाजी चौकात निषेध सभा झाली. काकासाहेब शिंदे या युवकाला श्रध्दांजली वाहण्यात आली. महावीर डेअरी सुरु असल्याने युवकांनी तेथे दगडफेक केली. हॉटेल प्रियांका येथेही किरकोळ तोडफोड केली. दिवसभर कडकडीत बंद होता. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, आरपीआयचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

आटपाडी येथे पदयात्रा
आटपाडी -
 आटपाडीत कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शिंदे याला श्रद्धांजली वाहिली. सकाळी मराठा सेवा संघ, वीर मराठा आणि मराठा आरक्षण समितीसह विविध  मराठा संघटना आणि तरुणांनी एकत्र येऊन बसस्थानकापासून ते तहसील कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली. दुकाने  बंद करण्याचे आव्हान केले. या आव्हानाला प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद पाळला. 

म्हैसाळ येथे ‘बंद’
म्हैसाळ -
 येथे सकल मराठा समाजातर्फे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आरक्षणाबाबत वेळकाढूपणा करणाऱ्या शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष तानाजी घोरपडे, उपाध्यक्ष संभाजी शिंदे, मधुकर धुमाळ, गणेश निकम, बाळासाहेब घोरपडे, सचिन शिंदे, विलास पाटील, अरुण शिंदे, सुशांत घोरपडे उपस्थित होते.

जतला बाजारही बंद
जत -
 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आठवडा बाजार दिवशी मराठा आरक्षण कृती समितीने पुकारलेल्या ‘जत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अत्यावश्‍यक सेवा व भाजीपाला, फळ मार्केट व कोंबड्याचा बाजार वगळता बाजार पेठेतील सर्व दुकाने बंद होती. मंगळवारी आठवडी बाजारचा दिवस असूनही शहरातील प्रमुख बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.

लेंगरेत बसवर दगडफेक
लेंगरे (ता. खानापूर) -
 गावात जमलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी विट्याकडे येणारी एस. टी. बस फोडली. गावात सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी अनेक मराठा समाज बांधव रस्त्यांवर उतरले होते. काहींनी चौकात ठिय्या मारला होता. विटा आगाराची (एम एच - २० बीएल ११४१) ही एसटी बस घरनिकीहून विट्याकडे निघाली होती. ही बस लेंगरेत आली असताना काही तरुणांनी बसवर जोरदार दगडफेक सुरू केली. बसच्या मागच्या आणि पुढच्या काचावर दगडफेक झाल्याने बसचे नुकसान झाले आहे. ही माहिती समजताच विटा पोलिस स्टेशनचे निरीक्षक रवींद्र पिसाळ, सहायक पोलिस निरीक्षक धनाजी पिसाळ यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला. 

दरम्यान, बसवर दगडफेक करून दहा लाखांचे नुकसान केल्याप्रकरणी बस चालक रमेश गणपती रेणुसे यांनी अनोळखी दहा लोकांविरुद्ध विटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यातील दोन तरुणांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. अमर दिलीप दबडे व रंजित दिलीप माने (लेंगरे) अशी त्यांची 
नावे आहेत.

फडणवीस सरकार बरखास्त करा
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यभर शांततेत ५८ मोर्चे काढले. तरीही त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दखल घेतली नाही. उलट गेली दोन दिवस सुरू असलेले सरकार मोडीत काढत आहे. 

राज्यात आरक्षणापूर्वी नोकरभरतीबद्दल समाजात मोठा असंतोष आहे. मराठा आरक्षण समर्थनार्थ गंगाखेड तालुक्‍यात काकासाहेब शिंदे यांनी गोदावरी नदीत जलसमाधी घेतली. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा, त्यांचे सरकार बरखास्त करावे, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना आज दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. मराठा क्रांतीचे डॉ. संजय पाटील, विकास देसाई, सतीश साखळकर, महेश खराडे, अमोल  सूर्यवंशी, नानासाहेब कदम, प्रमोद जाधव, अशरफ वांकर, अनिल पाटील, प्रताप विचारे, नंदकुमार पवार, सतीश पाटोळे, अनिल मोहिते, हरीश कणेगावकर, किरण पवार आदी सहभागी झाले होते. 

आज सांगलीत जलसमाधी आंदोलन
मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षणासाठी कृष्णानदीवरील स्वामी समर्थ घाटानजीक उद्या (ता.२५) सकाळी १० वाजता जलसमाधी आंदोलन होणार आहे. त्याचबरोबर काकासाहेब शिंदे यांचे बलिदान वाया जाणार नाही, अशी शपथ घेतली जाणार आहे. मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. 

विटा येथे ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद 
विटा -
 मराठा आरक्षण मिळावे, यासाठी विटा येथे पुकारलेल्या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व पक्षीय मराठा बांधव व तरुणांनी शहरातील शिवाजी चौकातून खानापूर रस्ता, कऱ्हाड रस्ता, मायणी रस्ता, उभ्या पेठेतून दुचाकीवरून रॅली काढली. त्यानंतर रॅली शिवाजी चौकात आली. या रॅलीत माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील, नगरसेवक अमोल बाबर, डायमंड  कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष शंकर मोहिते, महाराष्ट्र राज्य मेडिकल कौन्सीलचे अध्यक्ष विजय पाटील, नगरसेवक दहावीर शितोळे सहभागी झाले होते.

कडेगावात उद्या बैठक  
कडेगाव - सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा समितीच्या वतीने कडेगाव येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी (ता.२६) सकाळी ११ वाजता बैठकीचे  आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला जिल्हास्तरावरील समितीचे कार्यकर्ते व तालुक्‍यातील सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार  आहेत. या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती मोर्चा समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले आहे. मराठा समाजाने शांततेने आंदोलन केले. त्यावेळी सरकारने या मागणीचा तांत्रिकदृष्ट्या विचार न केल्‍याने  आंदोलनाचा भडका उडाला आहे. 
- गजानन कीर्तिकर,  शिवसेनेचे संपर्क नेते व खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com