#MarathaKrantiMorcha पंढरपुरात यात्रेमुळे बंद नाही

अभय जोशी
मंगळवार, 24 जुलै 2018

आषाढी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंद मधून आज पंढरपूरला वगळण्यात आले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन सुरळीत होते. तालुक्‍यात एक दोन ठिकाणी एसटी गाड्यांवर झालेले दगडफेकीचे प्रकार वगळता दिवसभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही.

पंढरपूर- आषाढी यात्रेसाठी आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंद मधून आज पंढरपूरला वगळण्यात आले होते. त्यामुळे शहरातील जनजीवन सुरळीत होते. तालुक्‍यात एक दोन ठिकाणी एसटी गाड्यांवर झालेले दगडफेकीचे प्रकार वगळता दिवसभरात कुठेही अनुचित घटना घडली नाही. 

आषाढी यात्रेसाठी यंदा 14 लाखांहून अधिक वारकरी आलेले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज देखील सहाव्या क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेलेली होती. व्यापाऱ्यांनी आपआपल्या दुकानांमधून यात्रेसाठी जादा माल भरलेला होता. अशा वेळी मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदमुळे पंढरपूर बंद ठेवण्यात आले असते तर वारकऱ्यांची गैरसोय झाली असती आणि स्थानिक व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला असता. 

दरम्यान, मराठा समाज बांधवांनी आणि विशेषतः पंढरपूर मधील विविध मराठा संघटनांच्या नेत्यांनी पंढरपूर मध्ये आज बंद न पाळण्याचा निर्णय घेतला. यात्रेसाठी आलेले वारकरी त्यांच्या घरी सुखरुपपणे पोचावेत यासाठी वारकऱ्यांच्या वाहनांवर तसेच एसटी गाड्यांवर दगडफेक करु नये असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे यांनी केले होते.

सकाळी तालुक्‍यात दोन ठिकाणी एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. तथापि, दुपारनंतर सर्व एसटी गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरु होती. दिवसभरात शहर व तालुक्‍यात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.

Web Title: MarathaKrantiMorcha Pandharpur is not closed due to pilgrimage