धरणे, रॅली  अन्‌ रास्ता रोकोही!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

मराठा समाजाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही गावांमध्ये कालच्या (ता. २५) प्रमाणेच आजही बंद पाळण्यात आला. शहरांसह गावोगावी बाजारपेठा बंद राहिल्या. आठवडा बाजार भरले नाहीत. तरुणांनी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी केली. ठिकठिकाणी धरणे धरण्यात आले. रास्ता रोको करण्यात आले. महामार्गही रोखण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. एसटीची चाकेही हालली नाहीत. 

मराठा समाजाच्या वतीने आज पुकारण्यात आलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही गावांमध्ये कालच्या (ता. २५) प्रमाणेच आजही बंद पाळण्यात आला. शहरांसह गावोगावी बाजारपेठा बंद राहिल्या. आठवडा बाजार भरले नाहीत. तरुणांनी मोटारसायकल रॅली काढून घोषणाबाजी केली. ठिकठिकाणी धरणे धरण्यात आले. रास्ता रोको करण्यात आले. महामार्गही रोखण्यात आला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली. एसटीची चाकेही हालली नाहीत. 

पाचगणीत बाजारादिवशीही शुकशुकाट
भिलार : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दिलेल्या बंदच्या हाकेला प्रतिसाद देत आज पाचगणी व पाचगणी परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आल्याने सर्व व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी पाचगणीत आज सर्व दुकानदारांनी आपली दुकाने सकाळपासून उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. त्यामुळे आठवडा बाजाराचा दिवस असूनही बाजारात शुकशुकाट जाणवत होता.

आज सकाळी पाचगणी व परिसरातील मराठा समाजबांधव हजारोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी चौकात जमा झाले. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून शासनाच्या निषेधार्थ प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. 

शिवाजी चौकातून भव्य मोर्चाला प्रारंभ झाला. हातात भगवे ध्वज घेतलेल्या युवकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ व शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. हा मोर्चा बस स्थानकाजवळ आल्यानंतर या ठिकाणी मोर्चेकऱ्यांतर्फे शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची होळी करण्यात आली. बंदच्या काळात सहायक पोलिस निरीक्षक तृप्ती सोनावणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

गोंदावल्यात बंदला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद 
गोंदावले : मराठा आरक्षणप्रश्‍नी येथे आज कडकडीत बंद पाळण्यात आला. गोंदावलेकर महाराज समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही या बंदमुळे खूपच कमी झाल्याचे दिसत होते. मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री बंदचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे सर्व व्यापारपेठ बंद ठेवण्यात आली होती. नेहमी वर्दळीच्या असणाऱ्या सातारा-पंढरपूर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता. श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर परिसरातही दुकाने बंद असल्याने रस्त्यावर क्वचितच भाविक दिसत होते.

खटावमध्ये उत्स्फूर्त बंद
खटाव : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी आज खटावमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व शासनाच्या उदासिनतेचा निषेध करण्यासाठी काल मराठा समाज बांधवांनी बंदचे आवाहन केले होते. आज मराठा समाजातील युवकांनी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन शासनाच्या निषेधार्थ मूक फेरीचे आयोजन केले. फेरीदरम्यान खटाव बाजार पेठेतील व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. गावातून फेरी झाल्यावर काकासाहेब शिंदे यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

Web Title: #MarathaKrantiMorcha Rally Rasta Roko in satara district