#MarathaKrantiMorcha साताऱ्यात रणकंदन

#MarathaKrantiMorcha साताऱ्यात रणकंदन

सातारा - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या "बंद'ला साताऱ्यात आज हिंसक वळण लागले. महामार्ग रोखणाऱ्या युवकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर अक्षरश: रणकंदन झाले. चवताळलेल्या युवकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सहा पोलिस गंभीर, तर 25 ते 30 जण किरकोळ जखमी झाले. त्यानंतर आक्रमक झालेल्या पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत प्रतिहल्ला चढवला. तरीही संतप्त आंदोलक मागे हटण्यास तयार नव्हते. गारांचा सडा पडावा अशा पद्धतीने दगड रस्त्यावर पडत होते. महामार्ग व बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात दगड व काचांचा खच पडलेला होता. तब्बल तीन तासांच्या धुमश्‍चक्रीनंतर पोलिसांना जमाव पांगवण्यात यश आले. हल्ल्यामुळे चिडलेल्या पोलिसांनीही सापडलेल्या युवकांना बेदम मारहाण केली. सुमारे 90 युवकांना ताब्यात घेण्यात आले. 

सकाळी दहा वाजता राजवाडा येथून मराठा समाजाच्या रॅलीला सुरवात झाली. रॅली अत्यंत शांतपणे पोवई नाक्‍यावर आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली. या ठिकाणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, शशिकांत शिंदे व जयकुमार गोरे यांनी सहभाग घेतला. या वेळी युवकांचा एक जमाव लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करत होता. संयोजक व आमदारांनी आवाहन करूनही कोणी शांत बसत नव्हते. शेवटी आमदार शिवेंद्रसिंहराजे, शशिकांत शिंदे व जयकुमार गोरे रस्त्यावर बसले. तरीही युवकांचा गोंधळ सुरूच होता. समन्वय समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेला युवकांचा जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. मुख्यमंत्री, महसूलमंत्री व भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरूच होती. 

घोषणाबाजी करतच हा जमाव बॉम्बे रेस्टॉरंटच्या दिशेने गेला. त्याला आणखी युवकांची साथ मिळाली. या युवकांनी बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर महामार्ग अडविला. तेथे उपस्थित पोलिस आंदोलकांना थोपवू शकत नव्हते. आंदोलकांनी महामार्गावर टायर पेटवायला सुरवात केली. त्यामुळे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी तेथे गेले. तरीही आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. टायर विझवण्यासाठी अग्निशामक दलाची गाडी आणण्यात आली. पोलिसांना जमाव नियंत्रणात येत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसलेल्या समन्वय समितीच्या सदस्यांना बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर नेण्यात आले. 

समन्वय समितीचे सदस्य व पोलिस अधीक्षक आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, शासनाच्या धोरणाच्या विरोधात चवताळलेले युवक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी महामार्गावरील रस्ता दुभाजकावर लावलेले पत्रे काढण्यास सुरवात केली. पोलिस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी व समन्वय समितीचे सदस्य या युवकांची समजूत घालण्याचे काम करत असतानाच काही पोलिसांनी युवकांवर लाठीहल्ला सुरू केला. तेथून रणकंदनाला सुरवात झाली. 

लाठीहल्ला झाल्यानंतर पोलिस युवकांचा पाठलाग करू लागले. त्यामुळे काही युवक मागे पळाले, तर काही पुलाच्या खाली गेले. मात्र, पळून न जाता त्यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक सुरू केली. एवढा प्रतिकार होईल याचा अंदाज नसलेल्या पोलिसांना काय करावे हे समजलेच नाही. दगडफेक करत युवक पुन्हा चालून आल्यामुळे पोलिसांना काढता पाय घेण्याची वेळ आली. पोलिस पुढे आणि दगडफेक करत आंदोलक मागे अशी स्थिती निर्माण झाली. आंदोलकांनी पोलिस गाड्यांना लक्ष्य केले. त्या ठिकाणी असलेल्या सर्व गाड्या फोडण्यात आल्या. मागे निघून जात असलेल्या गाड्या आंदोलकांनी पाठलाग करून फोडल्या. या दगडांच्या वर्षावात एका गाडीमध्ये पोलिस सापडले. त्या गाडीवर काही आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. या वेळी पाच पोलिसांच्या डोक्‍याला दगड लागल्याने ते रक्तबंबाळ झाले. पोलिस गाडीमध्ये व गाडीच्या आडोशाला पोलिस अधीक्षक व पोलिस अडकून पडले. तरीही संतप्त युवकांची दगडफेक सुरूच होती. या दगडफेकीतच काही आंदोलक युवक व पत्रकारांनी कडे करत पोलिसांना सुखरूप बाजूला काढले. 

जादा कुमक मागविण्यात आली. हेल्मेट, ढाली व अश्रुधूराची नळकांडी घेऊन पोलिस सज्ज झाले. तोपर्यंत महामार्गावर पोलिस व इतर वाहने फोडण्यात आली. महामार्गाच्या कडेला असलेल्या वाहनांच्या शोरूमच्या काचाही आंदोलकांनी फोडल्या. त्यानंतर पूर्ण तयारीनिशी पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी हल्ला चढवला. अश्रूधुराची नळकांडी फोडत पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. नळकांडी फोडल्यानंतर पोलिस पुढे चाल करत होते. अशा प्रकारे आंदोलकांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकापर्यंत मागे रेटण्यात आले. अश्रूधुराची नळकांडी फुटत होती, तरीही युवक मागे हटण्यास तयार नव्हते. त्यांची दगडफेक सुरूच होती. दगडफेकीत सुमारे 25 ते 30 पोलिस किरकोळ जखमी झाले होते. 

युवकांना बेदम मारहाण 
तब्बल चार तासांच्या संघर्षानंतर काही आंदोलक युवक पोलिसांच्या ताब्यात सापडले. त्यामुळे संतप्त पोलिसांच्या रोषाचा त्यांना सामना करावा लागत होता. सापडलेल्या युवकांना पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यांना गाडीतून बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात उभारण्यात आलेल्या पोलिस चौकीत ठेवण्यात येत होते. सापडणाऱ्या प्रत्येक मुलाला आधी या चौकीत नेण्यात येत होते. तेथे आठ-दहा पोलिस बेदम मारहाण करत होते. यामध्ये अनेक पोलिसांच्या काठ्याही तुटल्या. त्यानंतर चौकीतील या युवकांना पोलिस गाडीतून शहर पोलिस ठाण्याकडे नेण्यात आले. मात्र, एकाही आंदोलकाला स्वत:च्या पायाने नीट चालत गाडीपर्यंत जाता येत नव्हते. 

"मोका अन्‌ ठोका' 
प्रतापसिंहनगर बाजूने प्रचंड दगडफेक करण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्यासह त्यांचे पथक, राज्य सुरक्षा दलाचे पोलिस जमावाला पांगवत होते. पाटबंधारे कार्यालयाच्या पुढेपर्यंत जमाव पांगविल्यानंतर मात्र पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली. दगडफेक करणाऱ्या काहींना धो धो धुतले. यात काहींनी पोलिसांविरोधात "मोका'च्या गुन्ह्यांचा वचपा काढण्याचा प्रयत्न केला असल्याचा, तसेच पोलिस कर्मचारी व अधीक्षकांवर हल्ला करण्यात हेच युवक असल्याचाही पोलिसांचा संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत दगडफेक करणाऱ्यांना शोधण्यासाठी प्रतापसिंहनगरमध्ये कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले होते. 

आमदार राजीनामे देणार का? 
ठिय्या आंदोलनादरम्यान आंदोलक युवक लोकप्रतिनिधींबाबत आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी आलेल्या आमदारांविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यात मराठा समाजाचे 145 आमदार आहेत. प्रत्येक जण आंदोलनात येतो. मात्र, पदाचा त्याग करत नाही. आमदारांनी आधी राजीनामा देऊन मराठी बाणा दाखवून द्यावा. त्यानंतरच आंदोलनात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. सायंकाळपर्यंत शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे भाऊसाहेब चिकटगावकर या आमदारांनी राजीनामा दिला. त्यामुळे एवढ्या रणकंदनानंतर साताऱ्यातील आमदार काय भूमिका घेतात, याकडे आंदोलकांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com