सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन

दत्तात्रय खंडागळे 
गुरुवार, 26 जुलै 2018

गुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून आपले विचार मांडले. मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता शांततेेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे. असे आवाहन सर्वच नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. 

संगेवाडी (जि. सोलापूर) : मराठा समाज आरक्षण मागणी आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी (गुरुवार ता.२६) रोजी सांगोला तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, संघटनेसह विविध ग्रामपंचायतीकडून बेमुदत ठिय्या आंदोलनास पाठिंबा देवून लेखी पत्र दिले आहे. आंदोलनस्थळी मराठा समाज बांधवांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत टाळ, मृदंगाच्या निनादात हरीनामाचा गजर सुरु केला आहे. गुरुवारी दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देवून आपले विचार मांडले. मराठा समाज बांधवांनी आक्रमक भूमिका न घेता शासकीय मालमत्तेचे नुकसान न करता शांततेेच्या मार्गाने आंदोलन चालू ठेवावे. असे आवाहन सर्वच नेतेमंडळींकडून करण्यात येत आहे. 

सकल मराठा समाजाच्या वतीने गेले तीन दिवस आरक्षण मागणीसाठी सांगोला तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु आहे. राज्यात मराठा समाज बांधव आरक्षणासाठी आक्रमक झाले असून या आंदोलनात दोन मराठा बांधव बळी गेले आहेत. तरीही निर्ढावलेले सरकार आरक्षणा बाबतीत कोणताही ठोस निर्णय घेण्यास दिरंगाई करीत असल्याचा आरोप संतप्त मराठा समाजाकडून होत आहे. केवळ चर्चा करुन चालणार नाही तर आता आरपारची लढाई करावी लागणार आहे.

गेले तीन दिवस सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावातील मराठा बांधव दिवस-रात्र बेमुदत आंदोलन ठिकाणी ठिय्या मांडून सरकारच्या निर्णयाची वाट पाहत आहेत. मराठा बांधवांच्या आरक्षणाची मागणी आक्रमक होत चालल्याने शहर व तालुक्यातील मुस्लिम ऑल बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन इंडिया शाखा-सांगोला, भारतीय युवा मोर्चा, अखिल लोहार गाडी लोहार समाज विकास संस्था, जैन सोशल ग्रुप, नाभिक महासंघ, सांगोला तालुका काँग्रेस कमिटी ओ.बी.सी.विभाग, कैकाडी समाज युवक संघटना, सांगोला तालुका कॉंग्रेस कमिटी, दि ग्रेट टिपू सुलतान ब्रिगेड, समर्थ जेष्ठ नागरिक संघ, आदर्श नाभिक सेवा मंडळ, परिट समाज सेवा मंडळ, सांगोला तालुका महिला महासंघ, सांगोला बार असोसिएशन, भटके विमुक्त हक्क परिषद, स्वाभिमानी धनगर समाज संघटना, धनगर आरक्षण कृती समिती, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी होलार संघटना, या संघटना सामाजिक संस्थेने आपल्या पाठिंब्याचे लेखी पत्र  दिले आहे. तर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी ठराव देवून पाठिंबा दर्शविला आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MarathaKrantiMorcha Thiyya Agitation at Sangola tehsil office solapur