मराठेशाहीचा इतिहास शिल्पकृतीतून...

- सुधाकर काशीद
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून जपण्याचा एखादा प्रयत्न करतो. कोणी डॉक्‍युमेंटरी करतो, कोणी कागदपत्रे जतन करतो. पण कोल्हापुरातील एका तरुणाने शिल्पकृतींच्या माध्यमातून मराठेशाहीचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकार प्रताप कोळेकर या अवघ्या २४ वर्षाच्या तरुणाचा पहिला प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांच्या तरुणपणीच्या एका शिल्पातून साकारला गेला आहे. शाहू महाराज म्हणून एक विशिष्ट प्रतिमा जनमानसात आहे.

कोल्हापूर - इतिहास पुस्तकाच्या माध्यमातून जपण्याचा एखादा प्रयत्न करतो. कोणी डॉक्‍युमेंटरी करतो, कोणी कागदपत्रे जतन करतो. पण कोल्हापुरातील एका तरुणाने शिल्पकृतींच्या माध्यमातून मराठेशाहीचा इतिहास जपण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकार प्रताप कोळेकर या अवघ्या २४ वर्षाच्या तरुणाचा पहिला प्रयत्न राजर्षी शाहू महाराजांच्या तरुणपणीच्या एका शिल्पातून साकारला गेला आहे. शाहू महाराज म्हणून एक विशिष्ट प्रतिमा जनमानसात आहे. पण शाहूंनी कोल्हापूरचा राज्यकारभार ज्या उमेदीत हाती घेतला, त्या काळातले शाहूंचे अनोखे रूप या शिल्पामुळे सामोरे आले आहे आणि हे शिल्प घराघरांत जावे म्हणून त्याचा आकार एक फुटापेक्षाही कमी ठेवण्यात आला आहे.

राजर्षी शाहू महाराज हे केवळ राजे नव्हे तर एक प्रेरणास्थान आहे. त्यांची अनेक छायाचित्रे आहेत. पुतळेही आहेत. पण त्यात एकसाचेपणा आहे. पुतळ्यांची उंची मोठी असल्यामुळे ते मोठ्या दालनात शोभणारे आहेत. पण ओंकार कोळेकर या तरुणाच्या मते शाहूंचे शिल्प प्रत्येक घरात ठेवता येईल, इतक्‍या आकाराचे व त्याची किंमतही सर्वांना परवडेल अशीच आवश्‍यक आहे. त्यामुळे त्याने शाहूंनी कोल्हापूर संस्थानचा कारभार हाती घेतला तेव्हा त्यांचे जे व्यक्तिमत्त्व होते, ते व्यक्तिमत्त्व पुतळ्यासाठी निश्‍चित केले. कारभार स्वीकारण्याच्यावेळी शाहूंनी जो दरबारी पेहराव केला होता तो पेहराव त्या व्यक्तिमत्त्वात होता. शाहूंचा हा चेहरा नव्या पिढीसमोर शिल्पाच्या रूपाने प्रथमच येणार होता.

ओंकार कोळेकर हा दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटचा जी. डी. आर्टचा विद्यार्थी. त्याने पहिल्यांदा आपल्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून हे शिल्प केले. नंतर त्याने अशाच वेगवेगळ्या शिल्पांच्या माध्यमातून मराठेशाहीचा इतिहासच साकारण्याचे ठरवले. आज त्याने केलेले शाहूंचे शिल्प कला जगतात कौतुकाचा विषय ठरले आहे. 

या शिल्पाच्या आता प्रतिकृती तयार केल्या जाणार आहेत. मोठी दालनेच नव्हे तर कोल्हापुरातील छोट्या-मोठ्या घरांतही हे शिल्प ठेवता येणार आहे. कोल्हापूरकरांचे शाहू प्रेम कसे आहे, याचा प्रत्यय ओंकार कोळेकरच्या या शिल्पात आहे. यापूर्वी शाहूंचा इतिहास जाणकारांनी जरूर वेगवेगळ्या माध्यमातून जपला आहे. आता शिल्पकृती हे नवे माध्यम ओंकारने आणले आहे. या शिल्पापाठोपाठ मराठेशाहीच्या इतिहासातील अन्य व्यक्तिमत्त्वांनाही तो याच शिल्पकृतीच्या माध्यमातून पुढे आणणार आहे.

शिल्प किंवा चित्र जरूर मोठ्या दालनांची शोभा वाढवते; पण शिल्प किंवा चित्र अनेक मध्यमवर्गीयांच्या घरात जेव्हा झळकेल तो क्षण कलाकाराच्या दृष्टीने आणखी समाधानाचा असतो. आम्ही हाच विचार मांडला. ओंकारने नेमक्‍या याच विचारातून हे शिल्प केले आहे.
- अजय दळवी, प्राचार्य दळवीज्‌ आर्ट इन्स्टिट्यूट

Web Title: maratheshahi history sculpture