मराठी चित्रपटसृष्टीला बुरे दिन... 

शिवाजी यादव
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - मराठी चित्रपटांना ऊर्जितावस्था देण्यासाठी राज्य शासनाने मराठी चित्रपट अनुदान योजना सुरू केली; मात्र पुरेशा निधीअभावी गोगलगायीच्या गतीने योजना सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत त्यामुळे 22 हून अधिक चित्रपट अनुदानाच्या प्रतीक्षेत तर 54 हून अधिक चित्रपट अनुदानास अपात्र ठरले आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला अच्छे दिन ऐवजी बुरे दिन आल्याचे दिसत आहे. 

मराठी चित्रपट अनुदानास पात्र ठरविण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या कला सांस्कृतिक विभागाकडे आहे. त्यासाठी 23 जणांची समिती आहे. ही समिती दिवसाला सहा ते आठ चित्रपट बघून त्यानुसार त्याचा दर्जा ठरवते. "अ' दर्जासाठी 40 लाख तर "ब' दर्जासाठी 30 लाखांचे अनुदान देण्यात येते. चित्रपटाचे विविध संदर्भ सूक्ष्म पातळीवर विचारात घेऊन दर्जा ठरवला जातो. मात्र असे अभ्यासूपणे चित्रपट परीक्षण करणारे काही मोजके सदस्य समितीत आहेत; तर काही सदस्यांच्या अनुपस्थितीमुळे चित्रपट परीक्षणाचे काम रंगाळत आहे. 

चित्रपटाला अनुदानासाठी पाच कोटींची तरतूद असते. गेल्या दोन वर्षांपासून यामध्ये वाढ झालेली नाही. एका वर्षात साधारण 80 ते 110 चित्रपट अनुदानाच्या यादीत असतात. अनेकदा संख्या वाढते. त्यामुळे चित्रपटांना अनुदान देणे अडचणीचे होते. गतवर्षी सर्वाधिक संख्येने चित्रपट अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आले; तर काही चित्रपट अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या चित्रपटांना अनुदान मिळेल की नाही याची खात्री नाही. 

मराठी चित्रपट क्षेत्रात नवीन कलावंतांचा प्रवेश होत आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीची गती वाढली आहे. चित्रपट निर्माते, बॅनर नवा आहे. या नव्या कलाकारांना, निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे. शासनाचे अनुदान मिळत नसल्याने निर्मात्यांना मुंबईतील बड्या उद्योजकांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. त्यातील काहींनाच त्यांचे साहाय्य होते. त्यामुळे शासनाने अनुदानासाठीची तरतूद वाढविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

दरम्यान, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले व महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांच्याशी संपर्क साधला. पण ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. 

Web Title: Marathi cinema bad day