मराठीच्या पाऊलखुणा सोशल मीडियावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - मराठी भाषा ही शाळेत किंवा विद्यापीठात जशी शिकता येते, तशी ती नित्य जीवन व्यवहारातही शिकली जाते. त्याच्याच छटा आठवडी बाजारापासून जत्रा-यात्रा ते बस स्थानकापर्यंत जागोजागी दिसतात. भाषेचा सर्वाधिक वापर याच ठिकाणी होतो. यातील काही प्रसंग कथारूपात वापरून सोशल मीडियावरील संदेशापासून लघुपटापर्यंत त्यांचे सादरीकरण केले जाते. यातूनच मराठी भाषा अधिक समृद्ध होत असल्याच्या ठळक खुणा दिसत आहेत. 

कोल्हापूर - मराठी भाषा ही शाळेत किंवा विद्यापीठात जशी शिकता येते, तशी ती नित्य जीवन व्यवहारातही शिकली जाते. त्याच्याच छटा आठवडी बाजारापासून जत्रा-यात्रा ते बस स्थानकापर्यंत जागोजागी दिसतात. भाषेचा सर्वाधिक वापर याच ठिकाणी होतो. यातील काही प्रसंग कथारूपात वापरून सोशल मीडियावरील संदेशापासून लघुपटापर्यंत त्यांचे सादरीकरण केले जाते. यातूनच मराठी भाषा अधिक समृद्ध होत असल्याच्या ठळक खुणा दिसत आहेत. 

ज्ञानपीठ पारितोषिकविजेते मराठी साहित्यिक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यांचा जन्मदिन "मराठी राज्यभाषा दिन' म्हणून साजरा केला जातो. याशिवाय 1999 पासून युनेस्कोने आवाहन केल्यानुसार 21 फेब्रुवारी हा दिवस "जागतिक मातृभाषा दिन' म्हणून साजरा करतात. या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून मराठीप्रेमी विविध संस्था 21 ते 27 फेब्रुवारी हा आठवडा "मायबोली मराठी सप्ताह' म्हणून साजरा करतात. 

मातृभाषा दिन देशासह राज्यात, जिल्ह्यात, गावात आणि गावागावातील प्रत्येक माणसापर्यंत पोचविण्यासाठी मराठी साहित्यप्रेमींकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये मराठीप्रेमी संस्थांकडूनही सर्वच माध्यमांतून मातृभाषा दिनाची प्रसिद्धी आणि प्रचार केला जात आहे. 

मराठी मातृभाषादिनी "मराठी सप्ताह' मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मराठी भाषा सर्वदूर पोचण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने या दिवशी मराठी भाषेबाबतची जाणीव आणि जागृती करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. राज्यात अनेक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. मायबोली मराठी सप्ताहाची संकल्पना आता महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात आणि गावागावात पोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

भाषेचे प्रयोग माध्यमातही होत आहेत. त्याचे शब्दचित्ररूप काही लघुपटांत दिसत आहे, तर काही चित्रपटांमुळे प्रादेशिक भाषेचा लहेजा लोकांपुढे येत आहे. 

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी पाचशेहून अधिक सबळ पुरावे व संदर्भ असलेला अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. साहित्यिक डॉ. हरी नरके यांनी हा संशोधनात्मक अहवाल तयार केला आहे. 

संशोधनात्मक लेखन 
मराठी भाषा संवर्धनासाठी विविध विद्यापीठांच्या स्तरावर संशोधनात्मक काम सुरू आहे. यातून महाराष्ट्रात सुमारे साठहून अधिक मराठी भाषेतील पुस्तके दोन वर्षांत प्रकाशित झाली आहेत. यात भटक्‍या विमुक्तांच्या भाषा, वऱ्हाडी भाषा, कोकणी, सीमावर्तीय, अहिराणी, वैदर्भी, आदिवासी अशा प्रादेशिक भाषांतील कथा-कादंबऱ्यांपासून ललित लेखनाचा समावेश आहे.

Web Title: Marathi language day on social media