बेळगावमध्ये मराठी महापौर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

बेळगाव - महाराष्ट्र व कर्नाटकचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगावच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे मराठीभाषकांनी बाजी मारली. सर्व 32 मराठी नगरसेवकांची वज्रमूठ कायम राहिल्याने विरोधी कन्नड गटाच्या ठिकऱ्या उडाल्या. महापौरपदी संज्योत बांदेकर, तर उपमहापौरपदी नागेश मंडोळकर या दोघांचीही 32 विरुद्ध 17 अशा दणदणीत मताधिक्‍याने निवड झाली. हा विजय म्हणजे पंचमंडळी, युवक मंडळे आणि दबावगटाच्या प्रयत्नांचे यश मानले जाते.

विद्यमान सभागृहात पहिल्यांदाच महापौर-उपमहापौर निवडणूक तिरंगी झाली. विरोधी गटात फूट पडल्यामुळे त्यांच्या दोन्ही गटांकडून महापौर व उपमहापौरपदासाठी स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरले. मराठीभाषकांकडून मात्र संज्योत बांदेकर आणि नागेश मंडोळकर यांचीच नावे निश्‍चित झाली आणि त्यांनी विजयही मिळवला.

सौ. बांदेकर आणि मंडोळकरांना प्रत्येकी 32 मते मिळाली. पालकमंत्री रमेश जारकीहोळी गटाच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री माळगी आणि उपमहापौरपदाचे उमेदवार मुजम्मील डोणी यांना प्रत्येकी 17 मते मिळाली, तर माजी मंत्री सतीश जारकीहोळी गटाच्या उमेदवार पुष्पा पर्वतराव आणि उपमहापौरपदाचे उमेदवार फईम नाईकवाडी यांना प्रत्येकी 10 मते मिळाली. या निवडणुकीत उमेदवारांच्या बाजूने आणि विरोधातही मतदान करावे लागते; पण आज कुणाच्याही विरोधात मतदान झाले नाही.

Web Title: marathi mayor in belgav