मलेशियात अटकेत असलेले चार तरुण काल अक्कलकोटला परतले

राजशेखर चौधरी
शनिवार, 27 जानेवारी 2018

अक्कलकोट : मलेशियात हॉटेल मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असे सांगून एजंटने केवळ दोन महिन्याचा टुरीस्ट व्हिसा मिळवून दिला होता. त्यामुळे व्हिसाची मुदत संपल्याने तिथे गुरुनाथ इरण्णा कुंभार, मोहन अशोक शिंदे, समाधान ज्ञानेश्वर धनगर आणि दिपक लिंबाजी माने या चार तरुणांना अटक झाली होती. 

अक्कलकोट : मलेशियात हॉटेल मध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळवून देतो असे सांगून एजंटने केवळ दोन महिन्याचा टुरीस्ट व्हिसा मिळवून दिला होता. त्यामुळे व्हिसाची मुदत संपल्याने तिथे गुरुनाथ इरण्णा कुंभार, मोहन अशोक शिंदे, समाधान ज्ञानेश्वर धनगर आणि दिपक लिंबाजी माने या चार तरुणांना अटक झाली होती. 

कोल्हापूर सकाळमध्ये बातमी वाचूनच नातेवाईकांना माहिती मिळाली होती. त्यानंतर कागलचे प्रवीण नाईक जे मलेशियात एका कंपनीत नोकरीस आहेत. त्यांनी या चारही मुलांशी संपर्क करून जेलमध्ये भेट घेतली. दरम्यान अक्कलकोट तालुका भाजप अध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कुसुम यादव आणि सुषमा स्वराज्य यांच्याशी ट्विट करून घटनेची दाखल घ्यायला लावली आणि आवश्यक कागदपत्रे पाठवली त्यामुळे तिथे वकील देणे व शिक्षा कमी होण्यास मदत झाली असे कुंभार यांनी संगितले. त्यानंतर नाईक यांनी भेटायला जाणे, वकील देणे, एजंटकडून मूळ पासपोर्ट मिळविणे, त्यांना खाणेपिणे पुरविणे असे शेवटपर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे परदेशात देवमाणूस भेटल्याची जाणीव या मुलांना झाली. त्याचप्रमाणे कुसुम यादव आणि ज्ञानेश्वर मुळे यांचे अनमोल सहकार्य या सर्व प्रक्रियेला लाभल्याने सुटकेची प्रक्रिया सुखकर झाली. त्यांच्या अंधकारमय काळाला प्रकाशाची जोड मिळाली आणि भविष्याच्या आशा पुन्हा पल्लवित झालेले दिसले.

अटकेनंतर त्यांना मलेशियात तिथल्या कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालायात उभे केले असता त्यांना तीन महिन्यांची शिक्षा सुनावली गेली होती. त्यांची शिक्षा 14 जानेवारी रोजी संपुष्टात आली होती. जेलमध्ये 20 दिवसाचा एक महिना याप्रमाणे आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काल सुटका झाली. काल दिवसभर कागदपत्रे व तिकीट पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून विमानतळावर सोडेपर्यंत सात बंदूकधारी अधिकारी सोबतच होते. त्यानंतर काल  रात्री 10.10 च्या विमानाने मायदेशी रवाना झाले. ते विमानाने आज रात्री 12.30 वाजता हैद्राबाद विमानतळावर मायदेशी परतले आहेत. आज सकाळी हे चारही तरुण गुरुनाथची अक्कलकोटला असलेली बहीण नगरसेविका भागूबाई व मामा नागराज यांच्याकडे दाखल झाले. तिथून गाठीभेटी घेऊन आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन इतर तीन तरुण आपल्याला गावी जाण्यासाठी निघून गेले.

मलेशियात अटकेत असलेले चार तरुण आज मायदेशी परतले खरे पण पुढील मार्गक्रमणाच्या चिंतेने तरुण भेदरलेलेच दिसले. 'सकाळ'च्या प्रतिनिधीने त्या चार तरुणांची भेट घेतली आणि नेमकी घडलेली घटना आणि त्यांची पुढील दिशा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडून मिळालेली नेमकी माहिती अशी आहे. 

1. गुरुनाथ इरण्णा कुंभार
माझे गाव शिरवळ तालुका अक्कलकोट हे आहे. मी सांगलीत हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी मला वर्षभर शिकवायला कौस्तुभ पवार हे शिक्षक होते. त्यांचे सतत संपर्क माझ्याशी होते. शेवटी त्यांनी मला सांगितले की दरमहा तुला 36 ते 40 हजार इतका पगार मलेशियात मिळेल आणि दोन वर्षे तिथे थांबून अनुभव घेतला तर तुला भारतात आल्यावर चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे सांगितले. त्यामुळे माझा त्यांच्यावर विश्वास  बसला. त्यासाठी मी एकूण 1.50 लाख रुपये दिले. चार महिन्याचा तिथला पगार गेला तर गेला पण उर्वरित पगार मिळेल आणि अनुभव मिळेल आणि भारतात चांगली नोकरी मिळेल म्हणून मी हा निर्णय घेतला. वास्तविक पाहता माझे आई व वडील दोघेही शेतकरी आहेत. माझी परिस्थिती जेमतेमच आहे. खासगी व्याजाने ही रक्कम काढून भरले. मला सुरुवातीला तिथल्या 
व्हिसाचा डेमो दाखविला आणि या तात्पुरत्या व्हिसाने तुम्ही गेल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करून कायम व्हिसा मिळेल असे सांगितले त्याला साठ हजार खर्च येईल असे सांगितले. त्यामुळे एकत्रित 1.5 लाख दिले. दोन महिने सतत त्याच्याशी संपर्कात होतो पण त्याने दरवेळी वेगवेगळी सबब सांगून दिवसांवर दिवस पुढे नेले. अखेर माझ्यासह एकूण सहा जण एकत्रित एका खोलीत राहत होतो. त्यातील दोघे जण बाहेर जेवायला गेले होते तेवढ्यात इमिग्रेशन टीमची धाड खोलीवर पडून आम्हाला अटक केली गेली आणि शिक्षा झाली. त्या एजंटने त्याला असे होणार हे त्याला माहित असूनही फसवणूक करून आम्हाला वाईट स्थितीत ढकलले आणि आमच्या जीवाशी खेळ केला आहे. सदर प्रकारांची चौकशी होऊन आमचे पैसे व्याजासह मिळावेत आणि आम्हाला योग्य ठिकाणी नोकरी मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. 

2. दीपक लिंबाजी माने (२० वर्षे, रा.मानेगाव ता.मंगळवेढा) 
माझी घरची परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. आई वडील उसाच्या फडात ओझे वाहिल्याशिवाय आमचे घर चालणे अशक्यप्राय आहे. मी चांगलं शिकून नोकरी करून माझे घर सावरावे ही माझ्या आईवडिलांची तीव्र इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. पण याच काळात कौस्तुभने आमची इच्छा ओळखली होती. आणि आमचा गैरफायदा घ्यायचे मनोमन ठरवले पाणी मला तसूभरही संशय येऊ दिला नाही. माझ्याकडून एकूण सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी व दोन वर्षे मला मलेशियात ठेवण्यासाठी घेतले. पैसे जमविता आम्हाला नाकी नऊ आले होते. मिळेल त्यांच्याकडून व्याजाने पैसे काढले आणि त्याला दिले. सुरवातीला परमिट कार्ड टेम्पररी काढले त्यावर कामाचे नाव, कंपनीचे नाव अशी सर्व माहिती असलेले डमी ओळखपत्र दाखविले आणि पक्के दोन महिन्यांनी मिळेल असे खोटे सांगितले. आमची काम करण्याची इच्छा जास्त होती आणि भविष्याची आस त्यात भरलेली होती. त्यामुळे त्याच्या प्रत्येक बोलण्यावर आणि वागण्यावर आम्ही खूप विश्वास ठेवल आणि इथेच माझी फसवणूक झाली. मला शिकवत असलेले शिक्षकच पुढे झाल्याने मला कॉलेज काढून पाठविले जात आहे असेच वाटले होते. पण अटकेत असताना तिथे नोकरीला असलेले कागलचे प्रवीण नाईक यांनी मोठा आधार दिला आणि सर्व मदत केली म्हणून आम्ही लवकर परतलो अन्यथा आमचा मार्ग अधिक अवघड झाला असता. आता माझ्या डोळ्यापुढे अंधार आहे. मला माझे पैसे परत मिळणे आणि मला चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी मिळणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा माझी वाट आणखी बिकट असणार आहे यात शंका नाही.

3. समाधान ज्ञानेश्वर धनगर (वय २० वर्षे, रा.लेंडवे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगांव)
मी आणि मोहन हे दोघेही जळगांवच्या कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंट शिकलो आमचाही कौस्तुभशी संपर्क झाला. माझे आई आणि वडील दोघेही अपंग आहेत. त्यांना कोणतेही काम करणे जमत नाही. माझे शिक्षण पूर्ण होणे आणि मला नोकरी मिळणे व ते करणे हे माझ्यासाठी अत्यावश्यक आहे हे ओळखून एजंटच्या बोलण्यावर माझ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी भरवसा ठेवला. मी त्याला 1.20 लाख रुपये दिले ते कसे गोळा केले हे न सांगितलेलेच बरे आहे. एवढ्या वाईट आर्थिक परिस्थितीत मी पैसे भरून गेलो पण माझी दोनच महिन्यात फसवणूक झाल्याचे कळल्याने माझ्या पायाखालची जमीन सारकल्यागत झाली होती. नोकरी दूरच पण या लांब देशातील जेलमध्ये अडकल्याने माझा भविष्य अंधकारमय दिसू लागला. तिथे त्या एजंटाला वारंवार संपर्क केला पण त्यांनी दोन दिवसात सोडवून आणतो आणि तुमचे पैसेही परत देतो म्हणाला होता. पण आम्हाला सोडविणे दूरच उलट तीन महिन्याची शिक्षा झाली. प्रवीण नाईकांनी आम्हा चौघांची वारंवार भेट घेऊन खाण्यापिण्याची सोय केली. कायदेशीर मदत केली. अन्यथा मी आणखी कुजत पडलो असतो. त्या माणसावर  कायदेशीर अधिक माहिती अभावी अतिविश्वास ठेवला आणि हाच मुद्दा माझ्यासाठी धोकादायक ठरला आहे. माझी रक्कम व्याजासह मिळणे आणि चांगल्या हॉटेलमध्ये नोकरी मिळेपर्यंत माझा लढा सुरूच ठेवणार आहे.

4. मोहन अशोक शिंदे (वय २० वर्षे, रा. बेलवंडी, तालुका कर्जत जिल्हा. अहमदनगर)
आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत मोहन म्हणतो की मी हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले होते. माझ्या इतर मित्रांमुळे माझाही कौस्तुभ पवारशी संपर्क आला. त्याला मी कायम व्हिसा आणि आणि दोन वर्षाच्या नोकरीची हमी आणि भारतात परतल्यानंतर झालेल्या अनुभवाचा फायदा म्हणून मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरीची मिळालेली हमी यामुळे मी हारखून गेलो. त्यामुळे शेतकरी आई वडील आणि उत्पन्न अतिशय जुजबी असूनही मी त्याला 1.20 लाख रुपये भरले होते. पण मला
 टूरिस्ट व्हिसा मिळाला पण तो कायम झाला नाही. खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही. पवार हा फोन उचलायचा पण खोटे बोलून वेळ मारून न्यायचा त्यामुळे आम्ही गाफील राहिलो. त्याचा फायदा त्यांनी उचलला आणि मला आणि मित्रांना वाऱ्यावर सोडले. त्याचा धीरज पाटील हा साथीदार ही यात सामील झाला होता. आम्ही मलेशियात जेलमध्ये अडकलो. पण सर्वांच्या सहकार्याने आम्ही शिक्षा भोगून भारतात परतलो आहोत. नामदेव कुंभार या गुरूनाथच्या मामांनी आम्हाला परत आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आम्ही बारा जानेवारीला सुटल्यानंतर त्यांनी मलेशियात येऊन आमचे तिकीट स्वतः काढून दिले त्यामुळे माझा मार्ग सुखकर झाला. नोकरी बाजूलाच राहिली पण भारतात परत जाता येईल का नाही या भीतीने मला ग्रासले होते. मला तिथे कोणताही त्रास झाला नाही. जेवण वगैरे व्यवस्थित मिळाले. पण तिथल्या नियमाचा भंग या पवारमुळेच झाला होता. आता माझे पैसे आणि नोकरी मिळविणे हे ध्येय माझ्या समोर आहे. यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत. 

या सर्व मुलांची फसवणूक केलेले कौस्तुभ पवार आणि धीरज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक झाली होती. पण त्यांना जमीन मिळाल्याचे समजले आहे. व्याजासह या सर्व मुलांचे पैसे परत मिळायला पाहिजेत आणि परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी आश्वासीत केल्याप्रमाणे या चारही मुलांना पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळवून द्यावे आणि सहकार्य करून या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी इस्लामपूरच्या नामदेव कुंभार यांनी केली. 
 

Web Title: Marathi news akkalkot news boys release from Malaysia