पगारवाढ मिळणारे खासदार कोठे घाम गाळतात? : हजारे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

राळेगणसिद्धी : राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व खासदारांच्या पगारात सरकारने मोठी वाढ केली आहे. ही मंडळी असा किती व कोठे घाम गाळतात, की ज्यामुळे त्यांना केवळ पाच वर्षे काम करूनही भरघोस निवृत्तिवेतनाचा लाभ दिला जातो? आयुष्यभर शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला मात्र निवृत्तिवेतन मिळत नाही. शेतीप्रधान देशात यासारखे दुसरे दुर्दैव नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. 

'सकाळ'शी बोलताना हजारे म्हणाले, की देशात जी मंडळी नोकरदार म्हणून किंवा सेवक म्हणून काम करतात, त्यांना सरकार निवृत्तिवेतन देते; मात्र शेतकरी शेतात रात्रंदिवस कष्ट करतो व घाम गाळतो. त्याला मात्र निवृत्तिवेतन दिले जात नाही. त्यांच्या शेतमालाला रास्त बाजारभावही मिळत नाही. वास्तविक शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या किमान 50 टक्के अधिक भाव मिळणे गरजेचे आहे. गेल्या 22 वर्षांत सुमारे 12 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी सरकारला त्याचे काहीच कसे वाटत नाही? 

शेतकऱ्यांना जर उत्पादनखर्चावर आधारित बाजारभाव मिळाला, तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. उद्योगपतींना त्यांच्या मालाला बाजारभाव मिळत नाही, असे कधी होत नाही. मिळाला नाही तर ते आत्महत्या करताना दिसत नाहीत. तरी सरकार शेतकऱ्यांपेक्षा उद्योगपतींचीच जास्त काळजी करत असल्याचीही टीकाही हजारे यांनी केली. 

निवडणूक काळात स्वामिनाथन आयोग लागू करू अशी आश्‍वासने दिली होती; मात्र आता ते विसरले आहेत त्या वेळी त्यांच्या या आश्‍वासनाला व भूलथापांना शेतकरी भुलले असले, तरी आता मात्र शेतकरी विश्‍वास ठेवणार नाहीत. शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित योग्य बाजारभाव मिळावा व शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन मिळावे या मागणीसाठी 23 मार्चला दिल्लीत आम्ही आंदोलन करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत हे आंदोलन होणारच आहे. आता माघार घेणार नाही, असेही हजारे म्हणाले.

Web Title: marathi news Anna Hazare Budget 2018 Arun Jaitley