संजय राऊत भूकंप मापन यंत्र आहेत काय? - आशिष शेलार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "राज्यात जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल असे सांगणारे राऊत भूकंप मापन यंत्र आहेत काय?', अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. "राज्यात जुलैमध्ये राजकीय भूकंप होईल असे सांगणारे राऊत भूकंप मापन यंत्र आहेत काय?', अशा शब्दांत त्यांनी राऊत यांच्यावर टीका केली.

शेलार आज (शनिवार) महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूरात आले होते. त्यांना प्रेस क्‍लबच्या कार्यालयात वार्तालापासाठी आमंत्रित केल्यावर त्यांनी राजकीय षटकार मारत शिवसेनेवर टिकेची झोड टाकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्‍लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे होते. यावेळी बोलताना शेलार म्हणाले, "जुलैमध्ये महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असे सांगणारे राऊत भूकंप मापनयंत्र आहेत काय? ते बोल घेवडे आहेत. अस्तित्व दाखविण्यासाठी ते वारंवार असे वक्तव्य करीत असतात. शिवसेना आमचा मित्र पक्ष आहे. तो आमच्या बरोबर असेल. एकाच घरात राहून बाहेर जावून चर्चा करणारे, दोन्ही दगडावर पाय ठेवणाऱ्यांचे दोन्ही पाय कापले जातात, असे म्हटले जाते. हे शिवसेनेने विसरून चालणार नाही.' कर्जमाफीच्या समितीत शिवसेनेचे नेते परिवहन मंत्री दिवाकर रावते हे यांच्या नियुक्तीने ते नाराज असल्याच्या चर्चेबाबत बोलताना शेलार म्हणाले, "रावते ज्येष्ठ मंत्री आहेत. ते अनुभवी आहेत. एखाद्या समितीत नियुक्ती करणे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. हे त्यांना माहिती नसावे हे दुर्देवी आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात ही नियुक्ती केली आहे. हे त्यांनी जाणून घ्यावे.' "जय महाराष्ट्र' ला कर्नाटकात होणाऱ्या विरोधाबाबत बोलताना ते म्हणाले, "जय महाराष्ट्रला विरोध करणे म्हणजे भारत माता की जय म्हणण्याला विरोध आहे. संपूर्ण देश एकच आहे हीच भावना सर्वांची पाहिजे.''

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आयारामांनाच भाजपात पदे दिल्याने भाजपा कार्यकर्ते नाराज आहेत, यावर बोलताना ते म्हणाले,""आमचा पक्ष लोकशाही मानणारा आहे. येथे एक नेता, त्याची पत्नी, मुलगा पदे वाटत नाहीत. कोणी काय करायचे हे सर्वांनी मिळून ठरविले जाते. त्यामुळे कार्यकर्ते नाराज नाहीत हे आम्ही जाणून घेतले आहे.' शेलार यांना शाल आणि पुस्तक भेट देवून अध्यक्ष नलवडे यांनी त्यांचे स्वागत केले. "बी' न्यूजचे संपादक चारूदत्त जोशी, प्रेस क्‍लबचे सचिव विकास पाटील, सहसचिव पांडुरंग दळवी यांच्यासह अनेक पत्रकार यावेळी उपस्थित होते.

शरद पवारांनी चांगले काम केले
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे तत्कालिन अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी चांगले काम केल्याचे शेलार यांनी सांगितले. त्यामुळेच आज असोसिएशनचे खेळाडू जगभर गाजत आहेत. असोसिएशनच्या कामासाठी आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवून काम करतो, काम करीत राहणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

खा.शेट्टी- मंत्री सदाभाऊ चांगले नेते
खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत दोघेही शेतकऱ्यांचे चांगले नेते आहेत. खासदार शेट्टींच्या आग्रहास्तवच खोत यांना मंत्रीपद दिले. आता त्यांच्यात विसंवाद होत असेल तर तो त्यांना विचारला पाहिजे. आम्ही केवळ मित्रपक्ष म्हणून त्यांना मंत्रीपद दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news ashish shelar sanjay raut kolhapur news kolhapur press club