भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित

भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित

सातारा - जिल्ह्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच मतदारसंघांत उमेदवार निश्‍चिती करून आगामी निवडणुकीची रणनीती आखण्यात भारतीय जनता पक्षाने आघाडी घेतली आहे. या उमेदवारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्याबरोबर अन्य दोन मतदारसंघांमध्ये उमेदवार आयात करण्यासाठी पक्षाने गळ टाकले आहेत.

सर्वच पक्षांना लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. सत्तेचा कालावधी हा हा म्हणता संपून जाईल. त्याचबरोबर राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता मुदतपूर्व निवडणुका लागण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून संपूर्ण राज्य ढवळून काढले आहे. शिवेसनेच्याही कुरबुरी वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीला भक्कमपणे सामारे जाण्यासाठी पक्षाची सर्वच पातळ्यांवर तयारी असणे आवश्‍यक असल्याचे भाजपच्या धुरिणांनी जाणले आहे. त्यातून अत्यंत गुप्तपणे पक्षाची विविध मतदारसंघांतील उमेदवारांची चाचपणी व त्यांच्या विजयाच्या शक्‍यता तपासल्या जात आहेत. विविध आराखड्यांवर चाचपणी करून उमेदवार निश्‍चिती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या प्रक्रियेत सध्या स्वबळाचाच विचार दिसत आहे. मागील निवडणुकांत बरोबर असलेले मित्रपक्ष या वेळी साथ देतीलच अशी परिस्थिती नाही. राजू शेट्टी बाहेर पडले आहेत. धनगर आरक्षण देणे पक्षाला अद्याप जमलेले नाही. त्यामुळे धनगर समाजाचा नेत्यांवरच रोष वाढत चालला आहे. त्यामुळे महादेव जानकरही बरोबर राहतील की नाही आणि राहिले तर, समाज त्यांना कितपत साथ देईल, अशी भाजपला शंका आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केलेल्या जागांवरही भाजपचेच उमेदवार निश्‍चित केले जात आहेत.

जिल्ह्यातील आठ मतदारसंघांची चाचपणीही नुकतीच करण्यात आली. त्यामध्ये पाच जागांवर उमेदवार निश्‍चित करण्यात आले. वरिष्ठ पातळीवरून आलेले हे नियोजन नुकतेच जिल्हाध्यक्ष व शेखर चरेगावकर यांच्या उपस्थितीत संबंधित उमेदवारांच्या बैठकीत सांगण्यात आले. तसेच संबंधित उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार माण- खटाव मतदारसंघातून माजी आमदार दिलीप येळगावकर, कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे, सातारा-जावळी मतदारसंघातून दीपक पवार, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, तर, कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांची नावे निश्‍चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यातील उरलेल्या तीन मतदारसंघांमध्ये अद्याप पक्षाची चाचपणी सुरू आहे. त्यापैकी फलटण मतदारसंघ राखीव आहे. त्याचबरोबर त्याच्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा पगडा जास्त आहे. त्यामुळे तेथील उमेदवाराबद्दल नंतर खल केला जाणार आहे. उरलेल्या पाटण व वाई-खंडाळा-महाबळेश्‍वर या मतदारसंघांमध्ये पक्षाने इतर पक्षाचे उमेदवार आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचे तर, वाईमधून मदन भोसले यांचे मन वळविण्यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. दोघेही आपापल्या पक्षाचे सुरवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे मतपरिवर्तन कितपत होते, यावर या मतदारसंघांतील भाजपची उमेदवारी अवलंबून असणार आहे. भाजपने निवडणुकीचे बिगुल फुंकले असल्याने आगामी काळात या मतदारसंघांमध्ये राजकीय धुरळा उडण्यास सुरवात होणार हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com