सोलापूर- काँग्रेससमोर आव्हान; एमआयएमला  संधी

solapurmunicipalcorporation
solapurmunicipalcorporation

सोलापूर : महापालिका प्रभाग 14 'क' ची जागा जिंकून गड राखण्याचे आव्हान काँग्रेससमोर आहे, तर चौथीही जागा जिंकून वर्तुळ पूर्ण करण्याची संधी एमआयएमला आहे. भाजप, राष्ट्रवादी, माकप, शिवसेनेसह दिग्गज अपक्षही रिंगणात असल्याने ही लढत सप्तरंगी होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे नगरसेवक रफीक हत्तुरे यांचे निधन झाल्यामुळे प्रभाग 14 क ची पोटनिवडणूक लागली. फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत 
एमआयएमने या जागेवर उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे हत्तुरे यांचा मार्ग सोपा झाला आणि ते निवडूनही आले. उर्वरीत तीन ठिकाणी एमआयएमचे
उमेदवार विजयी झाले. 

ही पोटनिवडणूक एका जागेसाठी होणार असली तरी निकालानंतर महापालिकेतील अनेक समीकरणे बदलणार आहेत. काँग्रेसने गड कायम राखला तर त्यांची
संख्या 14 वर स्थिर होईल. एमआयएमने यश मिळवले तर प्रभागामध्ये चारही नगरसेवक त्यांच्या पक्षाचे होतील. भाजपने बाजी मारली तर त्यांच्या नगरसेवकांचे महापालिकेतील अर्धशतक पूर्ण होईल. शिवसेना, माकप किंवा राष्ट्रवादीचे उमेदवार जिंकले तर त्यांचे संख्याबळ एकने वाढेल. अपक्ष निवडून आला तर त्यास आपल्या पक्षामध्ये घेण्यास चढाअोढ लागेल.

उमेदवारीवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाही. त्यामुळे बंडखोरीची भीती त्यांना नाही. आपला उमेदवार कसा निवडून येईल याचेच नियोजन त्यांना
करावे लागणार आहे. एमआयएम, भाजप आणि शिवसेनेकडून एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे या तीन्ही पक्षांत बंडखोरीची शक्यता आहे. ती होणार नाही याची दक्षता संबंधित पक्षाच्या नेत्यांना घ्यावी लागणार आहे. एमआयएमने पीरअहमद शेख (मूळ राष्ट्रवादी काँग्रेस), भाजपने रणजीतसिंह दवेवाले (मूळ काँग्रेस) आणि शिवसेनेने बापू ढगे (मूळ भाजप) यांना संधी दिली आहे. मात्र आयात उमेदवारांमुळे पक्षांतर्गत बंडखोरी झाल्यास त्याचा फटका या तिन्ही उमेदवारांना बसू शकतो. या पार्श्वभूमीवर या तिन्ही पक्षाच्या नेत्यांना फार कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यात ते कितपत यशस्वी होतात हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

..तर होईल विक्रम
सार्वत्रिक निवडणुकीत एकही अपक्ष निवडून आला नाही. या पोटनिवडणुकीत अपक्षांची संख्या मोठी आहे. या प्रभागात मुस्लिम बहुल मतदार आहेत. प्रमुख पक्षाचे उमेदवारही
मुस्लिम आहेत. त्यामुळे मुख्य उमेदवारांमध्ये झालेल्या मतविभागणीचा फायदा होऊन एखादा वजनदार अपक्ष निवडून आला तर, तो नवा विक्रम होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com