नाईकबाचा डोंगरमाथा गुलालात रंगला

राजेश पाटील
शनिवार, 24 मार्च 2018

कायदा व सुव्यवस्थेसह विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. सर्व संबंधित विभागांचा एकमेकांशी चांगला समन्वय राहिल्याने आणि यात्रेकरू, भाविकांकडूनही त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने यात्रा सुरळीतपणे पार पाडणे शक्‍य झाले.
- स्वप्नील लोखंडे, सहायक पोलिस निरीक्षक, ढेबेवाडी

ढेबेवाडी - बनपुरी (ता. पाटण) येथील श्री नाईकबाचा डोंगरमाथा आज भल्या पहाटे गुलालात रंगून गेला. महाराष्ट्र व कर्नाटकातून लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांमुळे जणू तिथे भक्तीचा सागरच अवतरल्याचा भास झाला. चांगभलंचा गजर, हलगी-घुमक्‍याचा निनाद, गुलाल- खोबऱ्याची उधळणीत सजवलेल्या सासनकाठ्यांना खांद्यावर नाचवत सुरू असलेला हा भक्तीचा सोहळा सुमारे दोन लाख भाविकांनी अनुभवला.

श्री नाईकबा यात्रेत काल (ता. २२) ‘श्रीं’च्या नैवद्याचा दिवस असल्याने सकाळपासूनच भाविकांचा ओघ सुरू होता. विविध आगारांच्या बस, खासगी वाहने आणि बैलगाड्यांतूनही भाविक दाखल होत होते. मंदिरात नैवेद्य वाहण्यास व दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. अनेक युवक स्वयंसेवक म्हणून उत्स्फूर्तपणे कार्यरत होते. मंदिराचा गाभारा फुलांनी सजविला होता.

रात्री उशिरापर्यंत हलगी आणि ढोल-ताशांच्या गजरात भाविक सासनकाठ्या घेऊन मंदिराकडे दाखल होत होते. पहाटे निघणाऱ्या ‘श्रीं’च्या पालखी सोहळ्यासाठी प्रशासन, देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायतीने जय्यत तयारी केली होती. सकाळी पावणेसहा वाजता गुलालाच्या उधळणीत आणि चांगभलंच्या गजरात पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. मानाच्या सासनकाठीसह विविध भागांतून आलेल्या सासनकाठ्या सहभागी झाल्या. प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, वरिष्ठ अधिकारी नीता पाडवी, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, एन. आर. चौखंडे, राजेंद्र राजमाने, एम. के. आवळे, बजरंग कापसे, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे आदींसह ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यात्रास्थळी उपस्थित होते. मंदिरासह यात्रा परिसरात उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. काही सेवाभावी संस्था व व्यक्तींनीही भाविकांसाठी फराळ आणि पाण्याची सोय केली. भालेकरवाडी (बनपुरी) येथील दादू काळू शिंदे (वय ८५) यांच्या पुतळामाई पाणपोईजवळ रांजणातील थंडगार पाणी पिण्यासाठी यात्रेकरू आवर्जून थांबत होते. १९६७ पासून त्यांनी यात्रेत अखंडपणे हा उपक्रम सुरू ठेवला आहे. आता वय झाल्याने त्यांचे पुत्र शंकरराव मदतीसाठी तिथे थांबून होते. 

Web Title: marathi news dhebewadi news naikba yatra gulal