यात्रा तोंडावर... बांधकाम विभाग ढिम्मच!

श्री क्षेत्र नाईकबा - घाटात रस्त्याशेजारीच दरडींचे दगड पडून आहेत.
श्री क्षेत्र नाईकबा - घाटात रस्त्याशेजारीच दरडींचे दगड पडून आहेत.

ढेबेवाडी - चैत्राच्या चाहूलीबरोबरच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांना बनपुरी (ता. पाटण) येथील श्री नाईकबा यात्रेची चाहूल लागते. अवघ्या दहा दिवसांवर यात्रा येऊन ठेपल्याने तयारीची लगबग सुरू आहे. प्रतिवर्षी यात्रेपूर्वी दोन-चार दिवस अगोदर रस्त्यांच्या डागडुजीची कामे हाती घेऊन समस्या वाढविणाऱ्या बांधकाम विभागाबद्दल भाविकांसह नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 

चैत्रात होणाऱ्या श्री नाईकबा देवाच्या यात्रेसाठी दूरवरून भाविक येतात. यात्रेचे दोन दिवस आणि त्यानंतरच्या पाच रविवारी होणाऱ्या पाकाळण्यांना गर्दी असते. यात्रेत भाविकांची गैरसोय होऊ नये, कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी, यासाठी प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्त, एसटी वाहतूक, पार्किंग, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आदींचे नियोजन केले जाते. त्यासाठी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची यात्रास्थळी बैठकही होते. यात्राकाळात गर्दीवर तसेच मंदिर परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतात. शिस्तबद्ध दर्शन घडण्यासाठी पोलिस आणि स्वयंसेवकांची पथकेही तैनात असतात. डोंगरमाथ्यावर यात्रेपुरते तात्पुरते बस स्थानक उभारून विविध आगारांतून बसचे नियोजन करण्यात येते.  

डोंगरमाथ्यावर भाविकांची गर्दी
गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी कऱ्हाडहून मानाच्या सासनकाठीचे आगमन झाल्यानंतर यात्रेची चाहूल लागते. येत्या २२ मार्चला श्रींच्या नैवद्याचा दिवस असून २३ मार्चला पालखी सोहळा निघणार आहे. काही वर्षांपासून डोंगरमाथ्यावर श्री नाईकबा मंदिराचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत मंदिराच्या बऱ्याच कामाचा उरक झाला आहे.

अनेक भाविक कुटुंबीयांसह बैलगाडीतूनही येतात. यात्रा जवळ आल्याने मंदिरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. डोंगरमाथ्यावरील विहिरीत पायथ्याला असलेल्या बनपुरीतून पाणी आणण्यात आले आहे. यात्राकाळात विहिरीची पाणीपातळी कमी होत असल्याने महिंद धरणातून वांग नदीत पाणी सोडण्याचे नियोजनही करावे लागते. 

घाटमार्गातील रस्त्याची दुरवस्था
घाट मार्गातील रस्त्याच्या साइडपट्ट्या अनेक ठिकाणी उद्‌ध्वस्त झाल्या आहेत. पावसाळ्यात वळणावर तुटलेला रस्ताही तसाच आहे. दरडींचे अनेक मोठे दगड रस्त्याशेजारीच पडून आहेत. घाटात कुठेही सूचना फलक नसल्याने नवख्या वाहनचालकांचा गोंधळ उडत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत आणि झुडपेही तशीच आहेत. शिवाय ठिकठिकाणी खड्डेही दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच मिरज भागातून आलेली भाविकांची कार घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने घाटातून खाली कोसळल्याची घटना घडली. प्रतिवर्षी यात्रेपूर्वी दोन-चार दिवस अगोदर रस्त्याची डागडुजी हाती घेण्यात येत असल्याने बारीक खडी आणि मुरूम रस्त्यावर पसरून वाहने घसरण्याचे प्रकार घडतात. यात्रेच्या अगदी तोंडावर हे सोपस्कार करणाऱ्या बांधकाम विभागाला अगोदर का जाग येत नाही, असा प्रश्‍न भाविकांना अनेक वर्षांपासून येथे पडत आहे.

...ही आहे वस्तुस्थिती
 घाटात अनेक ठिकाणी साइडपट्ट्या उद्‌ध्वस्त
 दरडींचे मोठे दगड रस्त्याशेजारी पडून
 वळणावर तुटलेला रस्ता तसाच
 घाटात कुठेही नाहीत सूचना फलक
 रस्त्याच्या दुतर्फा गवत अन्‌ झुडपेही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com