कांद्याला चांगल्या दरामुळे शेतकरी खुशीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

वाठार स्टेशन - गृहिणींच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांद्याचे दर सध्या कडाडले आहेत. चांगला दर मिळत असल्याने हाच कांदा कोरेगावच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांना हसवतोय. 

वाठार स्टेशन - गृहिणींच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या कांद्याचे दर सध्या कडाडले आहेत. चांगला दर मिळत असल्याने हाच कांदा कोरेगावच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांना हसवतोय. 

उत्तर कोरेगावातील वाठार स्टेशन, जाधववाडी, फडतरवाडी, विखळे, तळिये, बिचुकले, देऊर या गावांत रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याचे आगार असलेल्या या भागात नोव्हेंबरमध्ये "गरवा' या जातीच्या कांद्याची लागण केली जाते. हे पीक पाच महिन्यांचे असून, एप्रिलमध्ये कांद्याच्या काढणीला सुरवात होते. एप्रिलमध्ये कांद्याला भाव मिळत नसल्याने हा कांदा "हळवा' कांद्यापेक्षा टिकाऊ असल्याने येथील शेतकरी हा कांदा एैरणीत साठवून ठेवतात. त्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागतो. एैरण तयार करण्यासाठी आयताकृती कळकाचे डांब रोवून त्याभोवती कडब्याच्या ताट्या बांधून त्यात कांदा टाकला जातो व त्यावर उसाची पाचट टाकून पावसापासून सुरक्षित ठेवला जातो. जून महिन्यानंतर दर येईल त्याप्रमाणे कांद्याची विक्री केली जाते. साठवताना कांदा खराब होण्याची शक्‍यता असते. जास्त दिवस साठवून ठेवल्याने कांद्याचे वजनही कमी भरले जाते. सध्या येथील कांद्याच्या पिकाला तीन महिने झाले असून, 30 ते 40 रुपये किलोला भाव मिळत असल्याने शेतकरी मोठा झालेला कांदा काढून त्याची विक्री करताना दिसत आहेत. ओला कांदा असल्याने त्याचे वजनही जादा भरत आहे. कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने येथील शेतकरी खुशीत आहेत.

Web Title: marathi news farmer onion