ग्रामपंचायत निवडणूक शांततेत

हुकूम मुलाणी          
रविवार, 31 डिसेंबर 2017

मंगळवेढा - महसूल खात्याच्या अखत्यारीत असलेल्या तहसील कार्यालयात तहसीलदारासह निवडणूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तरी देखील तालुक्यातील 39 गावातील ग्रामपंचायत निवडणूका महसूल व पोलिस खात्याने शांततेत पूर्ण केल्याची कौतुकास्पद कामगिरी पार पाडली. 

मंगळवेढा - महसूल खात्याच्या अखत्यारीत असलेल्या तहसील कार्यालयात तहसीलदारासह निवडणूक शाखेकडे पुरेसे मनुष्यबळ नाही. तरी देखील तालुक्यातील 39 गावातील ग्रामपंचायत निवडणूका महसूल व पोलिस खात्याने शांततेत पूर्ण केल्याची कौतुकास्पद कामगिरी पार पाडली. 

नुकत्याच तालुक्यातील 39 गावातील ग्रामपंचायत निवडणूका दोन टप्प्यात पार पडल्या. पहिल्या टप्प्यात रहाटेवाडी, फटेवाडी, खोमनाळ, तळसंगी, भालेवाडी, येड्राव, सोडडी, मारोळी, शिरनांदगी, हाजापूर, डोंगरगाव, गोणेवाडी, बावची, सलगर खु, ढवळस, गुंजेगाव, धर्मगाव, मारापूर, पाठखळ, पौट आदी 20 गावे व दुसऱ्या टप्प्यातील भाळवणी निंबोणी, चिक्कलगी, नंदूर, हिवरगाव, आंधळगाव, जालीहाळ, खडकी, शेलेवाडी, शिरसी, खुपसंगी, मुंढेवाडी, ब्रम्हपुरी, बठाण, उचेठाण, महमदाबाद हु, अकोला, जुनोनी, जंगलगी या 19 ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील तिन्ही नेत्यांचे गट असल्याने या निवडणूका चुरसीने पार पडल्या. यामधील काही संवेदनशील देखील होती. उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड यांनी शांततेत निवडणूका व्हाव्यात म्हणून 64 जणांना हद्दपार केले. मतदान करताना वयोवृद्धाचे मतदान कुणी करायचे यावरून काही गावात वादावादी झाली असली महसूल खात्याने नियोजनबध्द् हे मतदान पार पाडले. शिवाय मतदान कालावधीत कुठे यंत्रात बिघाड झाला नाही. तहसिलदार निलंबित प्रकरणानंतर नवीन तहसीलदार या कार्यालयात नाही. शिवाय निवडणूक शाखेकडे पदे रिक्त असताना अर्ज स्विकृती, छाणणी, अंतिम यादी, मतदान घेवून निकाल जाहीर करण्याचे काम प्र. तहसीलदार गणेश लव्हे यांनी महसूल खात्यामधील कर्मचारी, तलाठी, कोतवालाच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडले. तर पोलिस खात्याने देखील मतदाननंतर निकाल आणि निकालानंतरही ज्या गावातील निवडणूक त्या गावात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

उपविभागीय अधिकारी दिलीप जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी निवडणूक काळात प्रत्येक गावात जाऊन गावातील सर्व गटाला एकत्र करुन आदर्श आचारसंहीतेचे पालन करावे असे बजावत या कालावधीत चुकीचे कृत्य केल्यास कारवाई करण्याचा इशारा देखील दिला. प्रचारात कर्णकर्कश आवाज सोडल्याने तीन वाहनावर कारवाई देखील केली. शिवाय हद्दपार केलेले हद्दीत वावरताना दिसतात याची तपासणी देखील केली. त्यामुळे या गावात निवडणूक काळात निकालाअगोदर व नंतर कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील या निवडणूका शांततेच्या वातावरणात पार पडल्याने महसूल व पोलिस प्रशासन जनतेच्या कौतुकाला पात्र ठरले.

Web Title: Marathi News Grampanchayat elections police