महिन्यात सिटी स्कॅनची सुविधा 

मंगळवार, 6 मार्च 2018

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन बसविण्याच्या अनुषंगाने खासगी कंपनीच्या समितीने नुकतीच रुग्णालयातील जागेची पाहणी केली. त्यामुळे येत्या महिनाभरात सिटी स्कॅनची सुविधा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयात सिटी स्कॅन बसविण्याच्या अनुषंगाने खासगी कंपनीच्या समितीने नुकतीच रुग्णालयातील जागेची पाहणी केली. त्यामुळे येत्या महिनाभरात सिटी स्कॅनची सुविधा सुरू होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये एक्‍सरे व सोनोग्राफी चाचणीची सुविधा आहे. काही जिल्हा रुग्णालयांत त्या जोडीला सिटी स्कॅनची सोयही आहे. तशी ती साताऱ्यातही होती. मात्र, आधुनिक यंत्रांनी सुसज्ज असा रेडिओडायग्नोस्टिक विभाग सुरू करण्याचे गाजर दाखवत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी साताऱ्यातील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविण्याचा घाट घातला. त्यानुसार येथील सिटी स्कॅन मशिन कऱ्हाडला हलविलेही; परंतु येथील विभाग मात्र अद्याप सुरू झालेला नाही. त्यामुळे सुमारे साडेतीन वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन चाचणी बंद आहे. नवीन विभागामध्ये एमआरआय, सिटी स्कॅन, डिजिटल एक्‍सरे, टू डी इको, कलर डॉपलर व सोनोग्राफीच्या चाचण्या होणार असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात मात्र, येथील सुरू असणारी सिटी स्कॅन यंत्रणाही बंद पडली. 

महामार्ग व इतर राज्य मार्गावरील अपघातातील गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जाते. इतर आजारातील रुग्णांनाही या सुविधेची गरज असते; परंतु सिटी स्कॅनअभावी जखमी रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट दाखवावी लागत आहे. रेडिओलॉजी विभागाचे नियोजन बारगळले आहे. त्यामुळे किमान सिटी स्कॅन मशिन मिळावी, यासाठी रुग्णालय व्यवस्थापनाकडून पाठपुरावा सुरू होता. शासनाने खासगी कंपनीला सिटी स्कॅन मशिन चालविण्याचा ठेका दिला आहे. त्यानुसार संबंधित कंपनीच्या समितीने जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशिनसाठी आवश्‍यक असलेल्या जागेची पाहणी केली. आवश्‍यक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कामकाज सुरू झाले आहे. येत्या महिनाभरात ही सुविधा नागरिकांना उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई यांनी सकाळशी बोलताना सांगितले. 

खासगी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सिटी स्कॅन मशिन बसवण्याबाबत जागेची पाहणी केली आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांची पूर्तता झाल्यानंतर महिनाभरात सिटी स्कॅन यंत्रणा सुरू होण्याची शक्‍यता आहे.  
- डॉ. श्रीकांत भोई, जिल्हा शल्य चिकित्सक, सातारा 

Web Title: marathi news hospital City Scan Facility