पोलिसांची सारथी - गीतांजली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

महिलांनी प्रत्येक क्षेत्रात असावं. मात्र, प्रत्येक महिलेने आपले वेगळपण सिद्ध करण्यासाठी जिद्दीने झटावं, असं मला नेहमी वाटतं. त्याच जिद्दीने पोलिस दलात चालक पदावर काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला पोलिस दलासह नातेवाइकांनी साथ दिली. त्यामुळेच यशस्वी चालक म्हणून काम करू शकले. 
- गीतांजली देशमुख,  महिला पोलिस वाहन चालक, कऱ्हाड

कऱ्हाड - पोलिस खात्यात कधी कोणती वेळ कशी येईल, सांगता येत नाही. त्या सगळ्या वेळेत अत्यंत बहादुरीच व हुशारीच काम पोलिस खात्यातील वाहन चालक करतात. या पदावर येथे महिला कर्मचारी कार्यरत आहे. गीतांजली दिलीप देशमुख असे त्यांचे नाव. जिल्हा पोलिस दलात त्या एकट्याच महिला चालक आहेत. कऱ्हाडसारख्या संवेदनशील शहरात अत्यंत निडरपणे त्या जबाबदरी सांभाळताना दिसतात.  

लहानपणापासूनच गीतांजली यांना वाहन चालवण्याचा छंद आहे. आठवीपासूनच त्या चारचाकी वाहन चालवत आहेत. आई-वडिलांसह कुटुंबातील सगळ्यांनीच त्यांना या छंदात पाठबळ दिले. वेगळ काहीतरी करायचे, या हेतूने शालेय जीवनापासून वेगळा छंद जोपासणाऱ्या गीतांजली यांना नोकरीही त्याच धाटणीतील करायची होती. म्हणूनच त्या पोलिस भरतीकडे वळाल्या. मैदानावरील सरावासह त्यांनी लेखी परीक्षा लीलया पार पाडली. त्यात त्या यशस्वी झाल्याही अन्‌ २०१० मध्ये त्या पोलिस दलात भरती झाल्या. वर्षापूर्वी सातारा पोलिस मुख्यालयात असतानाच त्यांना संधी चालून आली. वाहनचालक पदासाठी कोर्स आला. त्यांनी त्या कोर्ससाठी नाव दिले.  कोर्सही पूर्ण केला आणि पोलिस विभागात चालक म्हणून रुजू झाल्या. सातारा मुख्यालयातून काही दिवसांतच त्यांची ऑगस्ट २०१७ मध्ये कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात बदली झाली. 

देशमुखवाडी (ता. पाटण) हे सौ. देशमुख यांचे माहेर. परळी वैजनाथ हे त्यांचे सासर. सातारा येथे कुटुंब स्थायिक आहे. सध्या त्या शहर पोलिस ठाण्यात चालक पदावर काम करताहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वाधिक क्राईम रेट असलेल्या या पोलिस ठाण्यात चालक पदावर काम करताना गीतांजली यांनी वेगळी क्रेझ निर्माण केली आहे. पोलिस व्हॅन चालवताना त्यांना पाहिल्यानंतर त्यांच्याकडे कुतूहलाने येणाऱ्या महिला, युवतींनाही त्या धाडसी होण्याचा संदेश देतात. पोलिस दलात स्वकर्तृत्वाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिला पोलिस चालक गीतांजली देशमुख यांच्या धाडसामुळे पोलिस दलात महिला चालक कर्मचाऱ्यांची संख्या निश्‍चितच वाढेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: marathi news International Women Day police geetanjali karad