जागा द्या; अन्यथा जेलमध्ये आंदोलन - अण्णा हजारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

राळेगणसिद्धी - दिल्ली येथील 23 मार्चच्या नियोजित आंदोलनासाठी केंद्र सरकारला 12 वेळा जागेसाठी पत्र पाठविले. मात्र, सरकारने अजून जागा दिलेली नाही. आपणास जागा न मिळाल्यास जेलमध्येच आंदोलन करावे लागेल, असा इशारा देणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले आहे.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसह लोकपाल, लोकायुक्त व निवडणूक कायद्यात सुधारणा करण्याच्या मागण्यांसाठी हजारे दिल्लीत 23 मार्चला आंदोलन करणार आहेत. त्यासाठी जागा मिळावी, म्हणून हजारे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे पोलिस आयुक्त, तसेच नगर निगमच्या सर्व विभागांना सात नोव्हेंबरपासून 12 वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, अजूनही आंदोलनासाठी जागा मिळालेली नाही. त्यामुळे हजारे यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच पत्र पाठवून आंदोलनासाठी जागा देण्याची मागणी केली आहे.

पत्रात हजारे यांनी म्हटले आहे, की विविध प्रश्‍नांसाठी मी आपणाकडे 43 वेळा पत्रव्यवहार केला. मात्र, आपण एकाही पत्राचे उत्तर दिले नाही. आम्ही शांततापूर्ण व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत. तेव्हा आमच्या आंदोलनासाठी जागा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र, जागा न मिळाल्यास नाइलाजाने जेलमध्ये आंदोलन करावे लागेल. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.

आंदोलनासाठी जागा दिली नाही तर याचा अर्थ सरकारचा हेतू चांगला नाही असा निघेल, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे.

Web Title: marathi news jail agitation anna hazare central government