कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाची गरज अधोरेखित

हेमंत पवार
सोमवार, 12 मार्च 2018

कऱ्हाड विमानळावर यापूर्वी वार्षिक २० ते ३० विमाने व हेलिकॉप्टरची लॅंडिंग होत होती. यंदा सुमारे ७० हेलिकॉप्टर आणि विमानांची लॅंडिंग झाली. धावपट्टीचे विस्तारीकरण आणि सोयी-सुविधा निर्माण झाल्यास लॅंडिंगची संख्या आणखी वाढेल.
- कृणाल देसाई, विमानतळ व्यवस्थापक, कऱ्हाड 

कऱ्हाड - सातारा-सांगली जिल्ह्यातील एकमेव मोठे विमानतळ म्हणून येथील विमानतळाचा लौकिक आहे. पश्‍चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणाऱ्या येथील विमानतळावर सातत्याने ‘व्हीआयपीं’ची वर्दळ असते.

काल माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसाठी आलेली विमाने आणि हेलिकॉप्टरची गर्दी विमानतळावर झाली होती. येथील विमानतळावर होणाऱ्या गर्दीचा विचार करून सोनहिरा साखर कारखाना परिसरात पाच हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण किती गरजेचे आहे, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. विस्तारीकरणाचा प्रस्ताव शासन दरबारी निधीच्या प्रतीक्षेत आहे. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना १९६२ मध्ये कऱ्हाड येथे विमानतळ सुरू करण्यात आले. सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील कऱ्हाड येथील एकमेव विमानतळ होते. त्यादरम्यान विमानतळाचा वापर सुरू झाला, तो आजही कायम आहे. विमानतळावर येणाऱ्या व्हीआयपींची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता आल्यामुळे येथून पुढील काळात हवाई वाहतूकही सुरू होऊ शकते, याचा विचार करून आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाचा मुद्दा हाती घेतला होता. त्यासाठी लागणारी जमीन घेऊन शासनाकडून त्यांना भरपाई देण्यासाठीची कार्यवाही करण्यात येणार होती. मात्र, त्याला जमीन देण्यास शेतकऱ्यांनी विरोध केला.

मात्र, प्रशासनाने विस्तारीकरणासाठी नेमकी किती जमीन लागणार, याचा सर्व्हे करण्यासाठी जमिनीची मोजणी केली. त्यानंतर ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांच्या आर्थिक भरपाईसह अन्य काही सोयी-सुविधांचा एक प्रस्ताव तयार करून तो शासन दरबारी सादर करण्यात आला. दरम्यानच्या काळात शेतकरी आणि प्रशासन, अधिकारी यांच्या बैठका झाल्या. शासन पातळीवर जमीन हस्तांतरणासाठीची तांत्रिक कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. त्यादरम्यानच्या काळात सरकार बदलल्याने तो प्रस्ताव गेली चार वर्षे तसाच प्रलंबित राहिला आहे. त्यासाठी आता निधीची प्रतीक्षा आहे. कऱ्हाड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आणि कोकणासह सांगली जिल्ह्यात जाण्यासाठी व्हीआयपी येथील विमानतळावर येत असल्याने त्याचा सातत्याने वापर होत असून त्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. कालच माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांसाठी आलेली विमाने आणि हेलिकॉप्टरची गर्दी येथील विमानतळावर झाली होती. येथील गर्दीचा विचार करून सोनहिरा साखर कारखाना परिसरात व्हीआयपींसाठी थेट पाच हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करण्यात आली होती. सातत्याने वाढणाऱ्या लॅंडिंगचा विचार करता कऱ्हाड विमानतळाच्या विस्तारीकरणाची खरच गरज असल्याचे दिसते आहे.

Web Title: marathi news karad news airport development