कर्ज भरण्यासाठी तगादा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरला. मात्र, अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. बॅंकेत चौकशी केल्यावर पुढे काय करायचे, हेच कोणी सांगेना. थकीत कर्ज व्याजासह भरा म्हणून बॅंकेचे अधिकारी मागे लागलेत.
- सतीश थोरात, शेतकरी, कार्वे

कऱ्हाड - कागदपत्रातील काही त्रुटी व काही तांत्रिक कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करूनही पुढे कार्यवाही होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांमागे बॅंकांनी कर्ज भरण्यासाठी तगादा लावला आहे. 

शासनाने कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले. त्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभर रांगेत उभे राहून अर्ज भरले. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर सरकारने शेतकऱ्यांच्या नावावरील कर्जाची माहिती बॅंकाकडूनही मागवली. त्याची पडताळणी केल्यावर त्यामध्ये काही बोगस शेतकऱ्यांचीही नावे समोर आहे. त्यानंतर काही दिवसांनी पडताळणी करून सरकारने कर्जमाफीची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली. मात्र, अजूनही कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. त्यासंदर्भात मोठा बोलबाला झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी संबंधित शेतकऱ्यांचीही पडताळणी करून त्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, असे जाहीर केले. मात्र, त्याला महिन्याचा कालावधी झाला, तरीही संबंधित शेतकऱ्यांना पुढे काय करायचे याबाबतचे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले नाही. संबंधित शेतकऱ्यांना बॅंकामध्ये जाऊन संपर्क साधावा, असे सांगण्यात आले. त्यानुसार बॅंकामध्ये जाऊन शेतकऱ्यांनी माहिती घेतल्यावर तेथे त्यांना तुमच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: marathi news karad news western maharashtra news loan farmer bank