माहितीच्या अधिकाराचा वापर करुन मागितली चौदा लाखांची खंडणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

माहितीच्या अधिकाराखाली 14 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला.

कऱ्हाड - तालुक्यातील 16 मंडलाधिकार्‍यांकडून माहितीच्या अधिकाराखाली काढलेल्या माहितीची भिती दाखवून सुमारे 14 लाखाची खंडणी मागितल्याचा गुन्हा शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला. विस्तार अधिकारी संजय विलासराव सोनवले यांनी फिर्याद दिली आहे. ज्यांनी खंडणी मागितली त्याचे नाव सांगण्यास पोलिसांनी तपासाचे कारण सांगून नकार दिला. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित खंडणी बहाद्दराने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीत झालेल्या 1998 ते 2012-13 या कालावधीतील कामांची माहिती घेतली. तपशीलवार माहिती माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी मागविली. त्यामध्ये 15 टक्के अनुदानातून होणाऱ्या कामांची माहितीही त्याने घेतली होती. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रारही दाखल केली होती. त्या तक्रारीचा फायदा घेऊन संबंधिताने तालुक्यातील 7 मंडलाधिकाऱ्यांकडे प्रत्येक 2 लाखप्रमाणे खंडणी मागितली. त्याचे मोबाईलवरील रेकॉडिंगही आहे. त्यामध्ये खंडणी मागितल्याचे स्पष्ट होत असल्याने त्याचा आधार घेऊन विस्तार अधिकारी सोनावले यांची तक्रार दाखल केली. त्यानुसार खंडणीचा गुन्हा दाखल झाला. ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे त्याचे नाव पोलिस तपासाचे कारण सांगून सांगण्यास नकार दिला. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव तपास करत आहेत.

Web Title: marathi news karhad extortion police right to information

टॅग्स