कबड्डी स्पर्धेत मुंबई-पुण्याची बाजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

कऱ्हाड - येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या 65 व्या महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई उपनगर तर पुरुषांमध्ये पुणे संघाने विजेतेपद पटकावले. काल रात्री उशिरा एक उपांत्य व दोन अंतिम सामने झाले. 

कऱ्हाड - येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या 65 व्या महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई उपनगर तर पुरुषांमध्ये पुणे संघाने विजेतेपद पटकावले. काल रात्री उशिरा एक उपांत्य व दोन अंतिम सामने झाले. 

ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. महिलांमध्ये मुंबई उपनगरने पुणे संघावर 7 गुणांनी तर पुरुष गटात चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात कोल्हापूर संघावर पुण्याने एका गुणाने विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने लिबर्टी मजदूर मंडळातर्फे स्पर्धा झाल्या. अंतिम लढतीवेळी पाऊस आल्याने त्या स्पर्धा स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या काल पार पडल्या. 

पुरुष गटात प्रारंभी सांगली व कोल्हापूर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. दोन्ही संघात मागच्यावेळी अटीतटीची लढत झाली होती. मात्र पाऊस आल्याने तो सामना रद्द केला होता. दोन्ही संघ मैदानात आमने सामने होते. दोन्ही संघाने एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यांतरापर्यंत सांगलीने 20-11 अशी नऊ गुणांची आघाडी घेतली होती. सांगलीच्या आक्रमक खेळीने कोल्हापूर संघाला जखडून ठेवले होते. मात्र शेवटच्या पाच मिनिटात कोल्हापूरच्या संघाने विजय खेचून आणला. कोल्हापूरचा महेश मगदूम, तुषार पाटील यांनी खेळाची सुत्रे हातात घेऊन खेळ उंचावला. अखेरच्या चढाईवेळी कोल्हापूरच्या विकी सुतके याने नितीन मदने याची पकड करत लोनसह तीन गुण घेतले. त्यामुळे सामना 28-28 असा बरोबरीत आला. यानंतर प्रत्येकी पाच चढाईची संधी देण्यात आली. त्यात कोल्हापूर संघाने 8-5 अशा तीन गुणांनी विजयी मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला. 

कोल्हापूर व पुणे यांच्यात अंतिम सामना झाला. कोल्हापूर संघाने पुण्यावर 13-11 अशी दोन गुणांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर खेळ उंचावत गेला आणि दोन्ही संघांनी 24-24 अशी बरोबरी साधली. हाही सामना बरोबरीत सुटल्याने प्रत्येकी पाच चढाया देण्यात आल्या. यात कोल्हापूर संघावर पुण्याने 6-5 असा एका गुणाने विजयी मिळविला. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर व पुणे संघ आमने सामने होते. गतवेळच्या स्पर्धेत पुणे संघाने मुंबई उपनगरवर मात करत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे अंतिम सामन्यांकडे लक्ष होते. सामना अटीतटीचा झाला. मुंबई संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव, कोमल देवकर यांनी उत्कृष्ठ खेळी केली. 

मध्यांतराला मुंबईने 12-11 अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर सामना चुरशीचा झाला. त्यामुळे मुंबईने सात गुणांनी 30-23 असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मुंबई उपनगरने मागील सामन्याचा वचपा काढल्याचे दिसून आले. 

माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पात्रीकर यांच्या  वाढदिवसानिमित्त सत्कारही झाला. लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष अरुण जाध यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, इंद्रजीत चव्हाण, सुनिल पाटील उपस्थित होते. एक उपांत्य सामना व दोन अंतिम सामने रंगणार होते. त्यामुळे स्टेडीयमवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिलांच्या मुंबई उपनगर व पुणे संघाचा सामना चांगलाच गाजला. त्यात मुंबईने वर्चस्व गाजवत विजयी मिळविला. त्यासह सर्वच सामन्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

Web Title: Marathi News Karhad News Kabaddi Match Mumbai Pune Team wins