शेतातही कांद्याला ‘किंमत’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

काशीळ - जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात नऊ हजार २४२ हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. जिल्ह्यात खटाव तालुक्‍यात सर्वाधिक तीन हजार ४४० हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. 

काशीळ - जिल्ह्यात रब्बी हंगामातील कांद्याची लागवड अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामात नऊ हजार २४२ हेक्‍टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली आहे. जिल्ह्यात खटाव तालुक्‍यात सर्वाधिक तीन हजार ४४० हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. 

जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव व खंडाळा या दुष्काळी तालुक्‍यांत रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पीक आहे. रब्बी हंगामात कांदा लागवडीच्या काळापासून कांदा दरात सुधारणा झाली. त्यामुळे दुष्काळी पट्ट्यासह जिल्ह्याच्या इतर तालुक्‍यांतील शेतकऱ्यांचा कांदा घेण्याकडे कल वाढला. त्यातून मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान तसेच सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे दुष्काळी तालुक्‍यातील अनेक गावांत दोन पिके निघतील एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. या पाण्यामुळे कांद्याच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. यावर्षी रब्बी हंगामात १४ हजार ९०५ शेतकऱ्यांनी नऊ हजार २४२ हेक्‍टर क्षेत्रावर कांदा लागवड केली आहे.

कांद्याच्या क्षेत्रातील वाढीमुळे उत्पादनातही वाढ होणार आहे. लागवडीच्या काळात कांद्यास अपेक्षित दर मिळाल्याने कांद्याचे बी तसेच रोपे (तरू) दुप्पट दराने खरेदी करून शेतकऱ्यांनी लागवड केली. 

लागवडीच्या काळात कांदा तेजीत असल्यामुळे तसेच पाण्याच्या उपलब्धतेमुळे कांदा लागवड करण्याकडे कल वाढला आहे. क्षेत्रात वाढ झाली असल्याने उत्पादनही चांगले मिळणार आहे. सध्या कांद्यास अपेक्षित दर आहेत. सातारा बाजार समितीत कांद्यास दोन हजार ते अडीच रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. जिल्ह्यात कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लोणंद बाजार समितीत जानेवारी माहिन्यात कांद्यास तीन हजार २०० ते तीन हजार ८०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाले. 

जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांतूनही पसंती
दुष्काळी तालुक्‍यांव्यतिरिक्त सातारा, कऱ्हाड, वाई, जावळी या पश्‍चिमेकडील तालुक्‍यांतही कांद्याचे पीक घेण्याकडे कल वाढला आहे. या तालुक्‍यांत कांद्यास आंतरपीक म्हणून प्राधान्य दिले जाते. मागील दोन वर्षांत कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या हंगामात मात्र सुरवातीपासून कांद्यास अपेक्षित दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडे काही प्रमाणात पैसे शिल्लक राहण्यास मदत होणार आहे.

Web Title: marathi news kashil news onion rate