संयुक्त जुना बुधवार पेठेचा प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर 2-0 ने विजय

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

कोल्हापूर - केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धेत संयुक्त जुना बुधवार पेठेने प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबवर 2-0ने विजय मिळविला असला, तरी सुमारे पन्नास मीटर अंतरावरून थेट गोलजाळीत गोल करणारा जुना बुधवारच्या निखिल कुलकर्णी चर्चेचा विषय ठरला. उत्तरेश्‍वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळाविरूद्ध त्याने सुमारे चाळीस मीटर अंतरावरून गोल केला होता. प्रॅक्‍टिसविरूद्ध त्याने आज केलेला गोल आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला साजेसा ठरला. छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धा सुरू आहे.

दिलबहार तालीम मंडळ "अ' व "ब' संघातून खेळणारा निखिल यंदा जुना बुधवारच्या गोटात सामील झाला. उत्तरेश्‍वरविरूद्ध त्याने केलेला गोल चर्चेचा ठरला. त्याची व्हिडीओ क्‍लिप्स व्हायरल झाली आणि त्याच्या गोलचे फुटबॉलप्रेमींनी कौतुक केले. प्रशिक्षक अमित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबविरूद्धचा (ब) सामना जुना बुधवारसाठी कस पाहणारा होता. प्रशिक्षक राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जुना बुधवारच्या खेळाडूंनी तंत्रशुद्ध खेळ कसा करावा, याची प्रचिती आज दिली. जुना बुधवारच्या दिग्विजय सुतारच्या पासवर प्रसाद पाटीलने 33 व्या मिनिटाला पहिला गोल केला. प्रॅक्‍टिसच्या अमित कारंडे, अमित लिमकर, मैनुद्दीन सैद, जॉन्सन, निखिल पाटील, रोहित भोसले यांनी चांगला खेळ करत गोल करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. जुना बुधवारच्या गोलक्षेत्रातून अचूक फटके मारण्यात ते कमी पडले.

उत्तरार्धात प्रॅक्‍टिसकडून अमित लिमकर, निखिल पाटील, मैनुद्दीन यांनी गोल करण्याच्या सोप्या संधी दवडल्या. जुना बुधवारकडून दिग्विजय सुतार, मोहम्मदीन शेख, प्रसाद पाटील यांनी त्यांचीच री ओढली. दोन्ही संघातील खेळाडू एकमेकाच्या गोलक्षेत्रात चेंडू घेऊन जात होते. फिनिशिंगअभावी त्यांना गोल करता येत नव्हता. त्यामुळे समर्थकांच्या प्रोत्साहनाचा जोरही कमी होता. या स्थितीत जुना बुधवारला मध्यरेषेच्या परिसरात फ्री किक मिळाली. या किकवर निखिलने 67 व्या मिनिटाला लगावलेला चेंडू प्रॅक्‍टिसच्या गोलरक्षकाच्या डोक्‍यावरून थेट गोलजाळीत शिरला. या अफलातून गोलने अख्खे स्टेडियम चकित झाले. जुना बुधवारच्या समर्थकांनी जल्लोष करत टाळ्यांच्या कडकडाटात निखिलला दाद दिली.

उद्याचा सामना : बालगोपाल तालीम मंडळ विरूद्ध संध्यामठ तरूण मंडळ, वेळ -
सायंकाळी 4 वाजता

Web Title: marathi news kolhapur football sports