पैशाचा पाऊस पाडण्याच्या अमिषाने लुटणारी टोळी जेरबंद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 जून 2017

पैशाचा पाऊस पाडतो असे अमिष दाखवून अनेकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वडणगे (ता. करवीर) अटक केली. येथील सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत ही टोळी होती.

कोल्हापूर - पैशाचा पाऊस पाडतो असे अमिष दाखवून अनेकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वडणगे (ता. करवीर) अटक केली. येथील सराफ दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत ही टोळी होती. यात एका डॉक्‍टरचाही समावेश आहे. त्यांच्याकडून दोन मोटारीसह एअर पिस्टल, एअर गन, सत्तूर तलवारी अशी घातक हत्यारे जप्त केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी दिली.

अटक केलेल्या संशयितांची नावे : सुधीर राचप्पा येनोळगे (वय 56, रा. मोरेवाडी, करवीर), चालक - गणेश बळवंत पाटील (वय 44, रा. वडणगे, ता. करवीर), संजयकुमार रामजी शर्मा (वय 40, रा. फतेहपूर, जिल्हा. महु), सुरेंद्र बनारासी जैसवाल (वय 37, रा. निराबाई अपार्टमेंट, ठाणे पश्‍चिम), चालक - हरीष रामसाहाज शर्मा (वय 25, कळवा, जिल्हा ठाणे, मूळ रा. उत्तरप्रदेश), वासूराम रामदवर जैसवार (वय 43, रा. पोखरण रोड, पश्‍चिम ठाणे), हवालदार तपसी सरोज (वय 44, रा. कांदिवली, मुंबई) आणि शशिकुमार रामजी शर्मा (वय 31, रा. अल्लापूर, इलाहाबाद) अशी त्यांची नावे आहेत.

वडणगे (ता. करवीर) गावात गेले काही दिवस काही तरुण संशयितरित्या वावरत आहे. ते एका सराफ दुकानावर दरोडा टाकण्यासाठी मोटारीतून येणार असल्याची माहिती करवीर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पथकाने सापळा रचला. कोल्हापूर ते रत्नागिरी रस्त्यावरील वडणगे फाट्यावरून जाणाऱ्या त्या मोटारीवर "वॉच' ठेऊन होते. मध्यरात्री संबधित मोटार या रस्त्यावरून जाताना त्यांना दिसली. चालकाला गाडी थांबविण्यास त्यांनी सांगितली. त्यानंतर गाडीची झडती घेतली. त्यात एअर पिस्टल, एअर गन, सत्तूर, तलवारी अशी घातक हत्यारे मिळून आली. त्यांच्यावरील संशय बळवाल्याने त्यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या मोटारीचीही पोलिसांनी तपासणी केली. त्यात त्यांना राईल पुलरचे साहित्य, पितळेच्या सोन्याचे पाणी दिलेल्या दोन विटा, बिस्कीटे आदी मिळून आले. पोलिसांनी दोन्ही मोटारीतील आठ जणांची चौकशी केली. त्यांनी आपली नावे सुधीर येनोळगे, गणेश पाटील, संजयकुमार शर्मा, सुरेंद्र जैसवाल, हरीष शर्मा, वासूराम जैसवार, हवालदार सरोज आणि शशिकुमार शर्मा असल्याचे सांगितले. यातील सुरेंद्र जैसवाल हा डॉक्‍टर आहे. वडणगे गावातील एका सराफ दुकानावर रात्रीच्या वेळी दरोडा टाकण्याचा बेत होता. यातील सहा जण पैशाचा पाऊस पाडतो (अर्थात 10 हजार रुपयाचे दुप्पट 20 हजार करून देतो) असे अमिष दाखवत होते. त्याची जाहीरात गणेश व सुधीर हे दोघे करत होते. त्यांना सावज सापडल्यानंतर त्याला एकाद्या माळरानात घेऊन जाऊन पिस्तूलचा धाक दाखवून ही टोळी त्याला लुटायची. असे अनेक प्रकार शहरासह जिल्ह्यात केल्याची कबुली या टोळीने दिली. याबाबत अद्याप तक्रारी दाखल नसल्यातरी त्यानी दिलेल्या कबुलीनुसार लुटीचा आकडा हा मोठा असण्याची शक्‍यता आहे.

टोळीतील एक डॉक्‍टर
संशयित दरोडेखोरांच्या टोळीतील सुरेंद्र जैसवाल हा डॉक्‍टर आहे. त्याच्याकडे "बीएएमएस्‌'ही पदवी आहे. तो मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात पुढे आला आहे. याची सत्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.

गणेश पाटील उच्च शिक्षीत
संशयित गणेश पाटील उच्च शिक्षीत आहे. तो यापूर्वी कसबा बावडा येथे राहत होता. गेल्या काही वर्षापासून तो पोलिस मुख्यालया जवळच एका अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेचे वर्ग घेत होता. त्यात पोलिसांच्या मुलांचीही संख्या मोठी होती. त्यामुळे त्याचे पोलिस खात्यातील अनेकांशी चांगले संबध असल्याचे तपासात पुढे आले.

 

Web Title: marathi news kolhapur news crime news maharashtra news