काळभैरव डोंगर बुडाला भक्तिरसात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

गडहिंग्लज : सीमाभागाचे श्रद्धास्थान आणि शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली. मंदिरात दर्शनासाठी 22 तासांहून अधिक काळ भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीने श्री काळभैरवाचा डोंगर भक्तिरसात बुडून गेला. शहरासह लगतच्या बड्याचीवाडी, बहिरेवाडी (ता. आजरा) आणि हडलगे येथे झालेल्या या यात्रेत सुमारे अडीच कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. 

गडहिंग्लज : सीमाभागाचे श्रद्धास्थान आणि शहराचे ग्रामदैवत श्री काळभैरवाची यात्रा आज उत्साहपूर्ण वातावरणात झाली. मंदिरात दर्शनासाठी 22 तासांहून अधिक काळ भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीने श्री काळभैरवाचा डोंगर भक्तिरसात बुडून गेला. शहरासह लगतच्या बड्याचीवाडी, बहिरेवाडी (ता. आजरा) आणि हडलगे येथे झालेल्या या यात्रेत सुमारे अडीच कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली. 

दरवर्षी श्री काळभैरवाची एक दिवसाची यात्रा होते. रात्री बारा वाजता प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय पूजा झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले झाले. पुजारी संजय गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी फुलांच्या साहाय्याने आकर्षक पूजा बांधली होती. या वेळी स्थानिक जीर्णोद्धार उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांसह मानकरी उपस्थित होते. पहाटे पाच वाजता दीपमाळेचे प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत गेली. मुख्यतः या कालावधीत महिलांसह सहकुटुंब दर्शन घेणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. सकाळी नऊपर्यंत ही गर्दी टिकून होती. 

त्यानंतर गर्दी थोडी कमी झाली. अकराच्या दरम्यान दर्शनासाठी पुन्हा गर्दीचा ओघ वाढला. खासकरून दुपारी बारा वाजता मंदिराभोवती फिरणारा सबिना सोहळा पाहण्यासाठी गर्दी होती. दुपारी बारा वाजता वाद्यांच्या गजरात मानाच्या सासनकाठ्यांसह आलेल्या पालख्यांचा सहभाग असणाऱ्या सबिनाला प्रारंभ झाला. मंदिराभोवती हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होती. सुमारे अर्धा तास हा सोहळा सुरू होता. या सोहळ्याची छायाचित्रे काढण्यासह मोबाईलवर छायाचित्रण घेण्यासाठी युवकांची एकच गर्दी होती. आर केबलवरून या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. मंदिरासह नव्याने उभारण्यात येणाऱ्या सभामंडपातून दर्शनासाठी भाविकांची सोय करण्यात आली होती. देणगी घेऊन व्हीआयपी पासद्वारे थेट दर्शनाची सुविधा होती. 

वाढत्या उन्हामुळे दर्शनासाठी झालेली गर्दी दुपारी थोडी ओसरली. सायंकाळी चारनंतर मात्र पुन्हा लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. यंदा दुचाकीसाठी बड्याचीवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेत तर चारचाकी वाहनासाठी एमआयडीसी परिसरात वाहनतळ करण्यात आले होते. यामुळे खासगी वाहनाने येणाऱ्यांना शेंद्री तलावाच्या पुलावरून चालतच मंदिराकडे जावे लागले. केवळ एसटी गाड्याच डोंगराच्या पायथ्यापर्यंत जात होत्या. परिणामी दरवर्षी होणारी वाहतुकीची कोंडी कमी झाली. येथून यात्रेला जाण्यासाठी लाखेनगर, बड्याचीवाडी असे एकेरी मार्ग तर परतण्यासाठी एमआयडीसी, मार्केट यार्ड असा परतीचा मार्ग होता. त्यामुळेही यात्रेला जाणे सोयीचे झाले. एसटी महामंडळाच्या साठहून अधिक गाड्या प्रवाशांची ने-आण करण्यासाठी कार्यरत होत्या. यात्रास्थळी तात्पुरते स्थानक तसेच येथील आगारात भाविकांना रांगेतून सोडण्यासाठी लाकडी बॅरिकेटिंग उभारले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही मोफत प्रवाशांना यात्रेसाठी ने-आण करण्यासाठी खासगी गाड्या कार्यरत होत्या. 

यात्रास्थळी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. यासह आरोग्य विभाग आणि केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालयातर्फे कक्ष उभारण्यात आला होता. सकाळपासून यात्रास्थळी असणाऱ्या विविध खाद्यपदार्थ, खेळणी, भांडी आदी खरेदी करण्यासाठी गर्दी होती. मंदिराच्या पायथ्याला पायऱ्या संपल्यानंतर दोन्ही बाजूला भरपूर अंतर ठेवून खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्रेत्यांना जागा दिली होती. त्यामुळे गर्दी, गोंधळ कमी होण्यास मोठी मदत झाली. यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिस उपअधीक्षक आर. आर. पाटील, पोलिस निरीक्षक बिपिन हसबनीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 125 पोलिस कर्मचारी कार्यरत होते. 

यात्रा दृष्टिक्षेपात... 

  • रात्री बारा वाजता शासकीय पूजा 
  • पहाटे पाच वाजता आरतीनंतर दीपमाळेचे प्रज्वलन 
  • दुपारी बारा वाजता सबिन्याचा सोहळा 
  • सव्वाशेहून अधिक पोलिस कर्मचारी कार्यरत 
  • यात्रेसाठी एकेरी वाहतूक व्यवस्था 
  • प्रथमच बड्याचीवाडीतच दुचाकी आणि चारचाकीसाठी वाहनतळ 
  • स्थानिकसह लगतच्या कर्नाटक आणि गोव्यातील दोन लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती 
  • दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत रांगा कायम 
Web Title: marathi news kolhapur news Kalbhairav yatra